धोनीसोबत भारताकडून खेळणं माझ्यासाठी मोठी संधी- वॉशिंग्टन सुंदर 

श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत स्थान देण्यात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने आनंद व्यक्त केला आहे तसेच भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीबरोबर खेळायला मिळणार असल्यामुळे तो आनंदात आहे.

“धोनी सोबत खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपट्टूचे स्वप्न असते, मला धोनीसोबत ह्यावर्षी काही आयपीएलचे सामने खेळण्याची संधी मिळाली. आता भारताकडून खेळताना ही सुवर्णसंधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.” असे गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने सांगितले. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी निवड झाल्यावर तो बोलत होता. 

२० डिसेंबर पासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध  सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अठरा वर्षीय तामिळनाडूचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याची आश्चर्यजनक निवड करण्यात आली. आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना धोनीने दिलेल्या सूचना पाळल्यामुळे कामगिरीमध्ये सुधारणा होत गेली. त्याचाच फायदा आता येणाऱ्या टी-२० मालिकेत सुद्धा होईल असे सुंदर म्हणाला.  

“आयपीएल ‘पॉवरप्ले’ मध्ये रोहित शर्मा, ब्रेडन मॅकल्लूम सारख्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी आणि धाडस धोनीने दिले. नेहमी प्रत्येक गोलंदाजांचे धडपण कमी करण्याची चोख जबाबदारी धोनी पार पडत असतो. मी खूप आनंदीत आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली मला भारताकडून खेळण्याची संधी मिळत आहे. संघाला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळी मी माझे योगदान देण्यास तयार आहे.” असेही तो पुढे म्हणाला.

आतापर्यंत त्याने १२ प्रथमश्रेणी सामन्यात २६.९३ च्या सरासरीने ३० बळी मिळवले आहेत तसेच आयपीएलमध्ये ११ सामन्यात २३.१२ च्या सरासरीने ८ बळी मिळवले आहेत.