या खेळाडूने केले आज आंतराष्ट्रीय टी २० पदार्पण

मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात वानखेडे स्टेडिअमवर तिसरा आणि अखेरचा टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात तामिळनाडूचा १८ वर्षीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याने श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने एक बळी घेतला होता. त्याला दुखापत ग्रस्त केदार जाधवचा बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली होती.

टी २० संघात मात्र त्याचा संघ निवड करतानाच समावेश करण्यात आला होता. त्याच्या बरोबरच बेसिल थंपी आणि दीपक हुडा या नोवोदित खेळाडूंचीही १५ जणांच्या संघात निवड झाली होती.

आजच्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे.

वॉशिंग्टन सुंदर यावर्षी तामिळनाडूकडून रणजी ट्रॉफीत खेळला आहे. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली होती. तसेच तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातूनही खेळला आहे.

याबरोबरच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता तसेच तो याच लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला होता.

भारताने आज नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.