एकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला

यावर्षी रणजी ट्रॉफीच्या विजेत्या विदर्भ संघाकडून खेळलेला अनुभवी फलंदाज वासिम जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी कोणतीही फी घेतली नाही.

जाफरने विदर्भाकडून खेळण्यासाठी मागील वर्षीच करार केला होता परंतु त्याला दुखापतीमुळे २०१६-१७ च्या रणजी मोसमात खेळता आले नव्हते. याविषयी जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यानंतर हिंदुस्थान टाइम्सशी संवाद साधताना माहिती दिली.

जाफर म्हणाला, “मी मागच्या मोसमासाठी (२०१६-१७) विदर्भ क्रिकेट बरोबर करार केला होता. ज्यात ते मला ऑक्टोबर, जानेवारी आणि मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये पैसे देणार होते. मी त्यांच्या रणजी ट्रॉफी संघात महत्वाची कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण दुखापतीमुळे हे शक्य झाले नाही तरीही त्यांनी मला पैसे देण्यात कधी संकोच केला नाही.”

“ऑक्टोबरमध्ये मी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हतो त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले नाहीत जे योग्य आहे. पण जानेवारीमध्ये मी फिट होतो पण मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी त्यांनी माझी निवड केली नाही. पण तरीही त्यांनी माझा आदर ठेवत करारानुसार मला पूर्ण रक्कम दिली.”

“मला विदर्भ क्रिकेटने माझ्याबतीत दाखवलेल्या आदराबद्दल कृतज्ञता ठेवायची होती. मी त्यांना या वर्षीच्या (२०१७-१८) मोसमासाठी कोणतीही फी न घेता खेळणार असल्याचे सांगण्यासाठी संपर्क साधला.”

विदर्भाने यावर्षी मिळवलेले रणजी ट्रॉफी विजेतेपद जाफरचे नववे विजेतेपद होते. याआधी त्याने मुंबईकडून खेळताना ८ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.

विदर्भाकडून खेळण्याच्या निर्णयाविषयी सांगताना जाफर म्हणाला, “मला अशा संघात खेळायचे होते ज्यात मी खेळू शकेल आणि माझे योगदान देऊन तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शनही करू शकेल. मी योग्य निर्णय घेतला.”

याबरोबरच मागील काही वर्षांपासून विदर्भ खेळात चांगली सुधारणा करत आहे. त्यांचे ३ खेळाडू १९ वर्षांखालील भारतीय संघात आशिया कपमध्ये खेळले आहेत, असेही जाफरने सांगितले.

यावर्षीच्या रणजी मोसमात जाफरने जवळजवळ ६०० धावा केल्या आहेत. त्याने जे काही कारकिर्दीत मिळवले आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “मला ईश्वराने जे काही दिले आहे त्याबद्दल आभारी आहे. मला जे मिळाले नाही त्याबद्दल मी चिंता करत नाही. तुम्ही ज्याला पात्र आहेत ते तुम्हाला मिळते यावर माझा विश्वास आहे. मला कसलीही तक्रार नाही, मला मी जिथे जाईल तिथे मिळणारा आदर खूप समाधान देतो.”

“मी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी कप आणि विजय हजारे या चार देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होतो, यापेक्षा मी जास्त काही मागू शकत नाही. या मोसमात विदर्भ ज्याप्रकारे खेळले आहेत त्याने मला खूप आनंद दिला आहे.”

यामुळे गौतम गंभीरने वासिम जाफरचे ट्विटरवर जोरदार कौतुक केले आहे.