तरच भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जर भारतीय संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी करायची असेल तर भारताला आपल्या पहिल्या डावात कमीतकमी ५०० धावा कराव्या लागतील असे मत व्यक्त केले आहे माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने.

विदर्भ रणजी संघाला पहिला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वासिम जाफरने दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल स्पष्ट मतं व्यक्त केली आहेत. ” आपण दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद केले आता आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आपल्या संघाने पहिल्या डावात ५०० धावा केल्या तर आपण आरामात हा सामना जिंकू शकतो. ” असे जाफर म्हणाले.

“सध्या खेळत असलेल्या संघातील बरेच फलंदाज आफ्रिकेत थोडेफार खेळले आहेत. शिवाय ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलँड सारख्या देशातही खेळले आहेत. त्यामुळे नक्की काय करायचं आहे हे त्यांना माहित आहे. फक्त त्यांनी खेळपट्टीवर वेळ व्यतीत करायला हवा. ते एकदा फॉर्ममध्ये आले की चांगला खेळ करतील. ” असेही ते पुढे म्हणाले.