एका चेंडूत ७ धावा, तेही नो- वाईड बॉल नसताना

इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट अर्थात काउंटी क्रिकेट आणि नेटवेस्ट टी२० ब्लास्ट यात कायमच नवनवीन विक्रम होत असतात. दरवर्षी यातील वेगवेगळ्या विक्रमांची चर्चा होत असते.

अतिशय उच्च दर्जासाठी जसे काउंटी क्रिकेट प्रसिद्ध आहे तसेच नेटवेस्ट टी२० ब्लास्ट फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये होणाऱ्या विक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. कालही नेटवेस्ट टी२० ब्लास्ट असाच एक खास विक्रम झाला.

नियमाप्रमाणे फेअर डिलिव्हरी अर्थात खेळण्यायोग्य चेंडूवर जास्तीतजास्त ६ धावा निघू शकतात. जर तो चेंडू नो किंवा वाईड बॉल असेल तर जास्तही धावा निघू शकतात. परंतु काल नेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये एका फेअर डिलिव्हरीवर ७ धावा मिळाल्या.

नेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये २७जुलै रोजी केंट आणि समरसेट यांच्यात हा सामना खेळवण्यात येत होता. त्यात समरसेटचा फलंदाज स्टीव डेविसने एका बॉलमध्ये ७ धावा केल्या. विशेष म्हणजे हा बॉल फेअर डिलिव्हरी प्रकारातील होता.

या फलंदाजाने जेव्हा फेअर डिलिव्हरीवर चेंडू मारला तो क्षेत्ररक्षकाकडे पोहोचण्यापूर्वी स्टीव डेविसने तीन धावा पळून काढल्या. जेव्हा क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकला तेव्हा त्याने दुसऱ्या बाजूचा फलंदाज मैदानात पोहचला नसल्या कारणाने गोलंदाजाकडे फेकला. परंतु तो काही गोलंदाजला अडवता आला नाही. त्यामुळे तो चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला.

मैदानावर उपस्थित पंचाने चौकारचा इशारा केल्यामुळे धावून काढलेल्या ३ आणि चौकारच्या ४ अशा एकूण ७ धावा त्या फेअर डिलिव्हरीवर समरसेट संघाला मिळाल्या. यापूर्वीही अशा अनेक वेळा १ चेंडूवर फलंदाजांना ७ धावा मिळाल्या आहेत.