कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद

बेंगलोर | विजय हजारे ट्राॅफीच्या पहिल्या सेमिफायनलमध्ये आज मुंबईचा सलामीवीर रोहित शर्माने एक जबरदस्त झेल घेतला. स्लिपमध्ये घेतलेल्या या झेलचा निर्णय अखेर तिसऱ्या पंचांच्या मदतीने द्यावा लागला. पंचांनाही निर्णय देताना अक्षरश: डोके खाजवावे लागले.

या सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैद्राबादकडून रोहित रायडूने १३२ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली तर कर्णधार अंबाती रायडूला मात्र ११ धावांवर समाधान मानावे लागले. निर्धारीत ५० षटकांत हैद्राबादने ८ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली.

यातील १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने बावनका संदीपचा पहिल्या स्लिपमध्ये झेल घेतला. कटचा फटका मारणाऱ्या संदीपचा हा झेल आरामात रोहितच्या हातात विसावला.

परंतु या झेलामध्ये नक्की चेंडू जमिनीला लागला की रोहितने यशस्वीरित्या घेतला हे स्पष्ट दिसत नव्हते. तसेच हा झेल घेतल्यावर रोहितने जोरदरा सेलिब्रेशनही केले होते.

अखेर अनेकवेळा रिप्ले पाहिल्यावर संदिपला बाद देण्यात आले. या खेळीत संदिपने ३३ चेंडूत २९ धावा केल्या होत्या.

फलंदाजीत मात्र रोहितला कोणतीही चमक दाखवता आली नाही. तो केवळ १७ धावांवर बाद झाला. तरीही मुंबईचा अंतिम सामन्यातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.