पंकज अडवाणीचा भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल

भारताचा दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीने किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या विजेतेपदांनंतर ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे.

अडवाणीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “आम्हाला काही देवत्व मिळालेलं नाही. आम्ही काही क्रिकेटर नाही. तर आम्ही यंदाचे आशियाई स्नूकर चॅम्पियन्स आहोत. अभिमान वाटतो. ”

किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर मात केली आहे. पंकज अडवाणी आणि लक्ष्मण रावत यांच्या भारतीय संघाने पाकिस्तावर मात करत विजेतपद पटकावलं.

विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघ पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. परंतु भारतीय हॉकी संघाने दोन वेळा पाकिस्तानला गेल्या महिन्यात हरवलं होत शिवाय महिला क्रिकेट संघानेही विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केलं. किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेतशी भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पंकज अडवाणीने हे ट्विट केले आहे.

भारतात भारतीय पुरुष क्रिकेट संघ सोडून इतर खेळ आणि खेळाडूंच्या कामगिरीकडे कायमचं दुलक्ष केलं जात. गेल्याच आठवड्यात यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने भाष्य केलं होत.