प्ले ऑफसाठी आम्ही वेगळी प्लॅनिंग करत आहोत – हरयाणाचे प्रशिक्षक रणबीरसिंग

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे खेळला जात आहे. काल झालेल्या पुणे विरुद्ध हरयाणा यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात पुण्याच्या चार गुणांनी पराभव झाला. हरयाणाने त्यांच्या साखळी फेरीतील सामन्यांचा विजयी शेवट केला. कालच्या पराभवानंतर पुणेरी पलटनला जर ए झोनमध्ये पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर पुढे होणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात फॉर्च्युनजायंट्स या दोन्ही संघांना हरवणे गरजेचे असणार आहे.

कर्णधार सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर या सारख्या उत्तम डिफेंडर्ससाठी ओळखला जाणारा या संघात युवा रेडर्स म्हणजेच प्रशांत राय आणि विकास कंडोला यांनीही विशेष कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात प्रशांत रायने सुपर टेन केला तर डिफेन्समध्ये कर्णधार सुरेंद्र नाडाने चार गुण कमावले.

मोहित चिल्लरला या सामन्यात संधी का देण्यात आली नाही असे विचारले असता त्यांचे प्रशिक्षक म्हणाले, “हा सामना लयीत येण्यासाठी जरी महत्त्वाचा असला तरी सुद्धा या सामन्यामुळे गुणतालिकेत असा काही फरक पडणार नव्हता. त्यामुळे आम्ही मोहित चिल्लरला विश्रांती देण्याचे ठरवले होते. मोहित चिल्लर हा उत्तम डिफेंडर आहे पण त्याला पायाच्या अंगठ्याला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याला विश्रांती देऊन नवीन खेळाडू वापरण्याचा प्रयत्न केला.”

डिफेंडर्सने भरलेल्या हरियाणाच्या संघात रेडर्स कमी जाणवते का असे विचारल्यानंतर ते म्हणाले, “आमच्याकडे दीपक दैया, प्रशांत राय आणि विकास कंडोलासारखे युवा रेडर्स आहेत, त्याचबरोबर वझीर सिंगसारखा अनुभवी रेडरही आमच्याकडे आहे. आम्ही या सामन्यात वझीर सिंगलाही विश्रांती दिली होती कारण प्लेऑफमध्ये मोहित चिल्लर आणि वजीर सिंग यांच्याकडून आम्हाला विशेष कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे.”

प्लेऑफमध्ये हरियाणा संघाकडून काही वेगळ्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांनी करावी का असे विचारल्यानंतर त्यांचे कोच म्हणाले, “साखळी फेरीतील सामने आणि प्ले ऑफमधील सामने यात खूप फरक असतो. प्लेऑफमध्ये तुम्हाला दुसरी संधी मिळत नाही पण साखळी फेरीत तुम्हाला दुसरी संधी भेटते. त्यामुळे प्लेऑफमधील सामन्यात आम्ही सर्व काही झोकून सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. गुजरात आणि पुण्यामध्ये अजूनही पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ चालू आहे, त्यामुळे अजूनही आम्हाला माहित नाही की आम्ही कोणाबरोबर एलिमिनेटर सामना खेळणार. जो संघ आमच्या समोर येईल त्या संघानुसार आम्ही प्लॅनिंग करणार आहे.”