तर रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार

नवी दिल्ली । भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

एमएसके प्रसाद यांनी विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच तो मर्यादित षटकांच्या दोन्ही मालिकेत न खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

” विराट श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. यात कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. कसोटीमालिकेनंतर आम्ही त्याला विश्रांती देण्याचा विचार करतोय. त्याला विश्रांतीची गरज आहे आणि रोटेशन पद्धत कर्णधारालाही लागू होते. ” असे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले.

एमएसके प्रसाद यांनी निवड समितीच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून रोटेशन पद्धतीने संघातील खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. परंतु आयपीएल स्पर्धेपासून विराट कोहली २८ आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून भारतीय संघ या काळात खेळलेला प्रत्येक सामना विराट खेळला आहे. रोटेशन पद्धतीनुसार केवळ विराट असा एकमेव खेळाडू आहे ज्याला विश्रांती देण्यात आलेली नाही.

संघातील प्रत्येक खेळाडूला विश्रांती देण्याच्या धोरणामुळे कर्णधार असला तरी विराटलाही विश्रांती देण्यात येईल असे प्रसाद म्हणाले आहेत. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हे शक्य नसल्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच विश्रांती देण्यात येईल.

याचमुळे यावेळी संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे असेल.