काय आहे सौरव गांगुलीसाठी त्याचे सर्वात मोठे यश?

माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तसेच त्याने भारतासाठी अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. यातील गांगुलीचे सर्वात मोठे यश कोणते याविषयी त्याने युट्युबमधील एका मुलाखतीत सांगितले आहे.

गांगुलीला जेव्हा विचारण्यात आले की त्याच्यासाठी त्याचे सर्वात मोठे यश कोणते, तेव्हा गांगुलीने उत्तर देताना एका शब्दात सांगितले की ” भारताचे नेतृत्व”. गांगुलीसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणे हे त्याच्यासाठी त्याचे सर्वात मोठे यश आहे.

गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व १९९९ ते २००५ पर्यंत सांभाळले आहे. या काळात भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले आहेत.

याबरोबरच गांगुलीला कर्णधार म्हणून घेतलेल्या कोणत्या निर्णयाबद्दल पश्चाताप होतो का किंवा वाईट वाटते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, “मला कोणत्याही निर्णयाबद्दल पश्चाताप वाटत नाही.”

तसेच यानंतर गांगुलीला जेव्हा विचारले की कर्णधार असताना त्याच्यासाठी सर्वात अवघड गोष्ट कोणती होती ? तेव्हा गांगुलीने सांगितले सर्वांना एकत्र आणणे ही त्याच्यासाठी सर्वात अवघड गोष्ट होती.

गांगुली जेव्हा भारताचा कर्णधार होता तेव्हा भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते.

गांगुलीने याबरोबरच अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत यात त्याने त्याने कोलकत्तामधील इडन गार्डनवर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी सामना सर्वात स्मरणीय सामना असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने लॉर्ड्सवर केलेले त्याचे पहिले कसोटी शतक त्याच्यासाठी त्याचे खास शतक असल्याचेही त्याने सांगितले आहे.

या मुलाखतीत गांगुलीला एक अट घालण्यात आली होती ती म्हणजे त्याने त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एका शब्दात किंवा एका वाक्यात द्यायची. त्याप्रमाणे गांगुलीने ती उत्तरे दिली.

गांगुलीने नुकतेच त्याचे ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ नावाचे त्याचे आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत असलेल्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.