फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?

-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 )

फुटबॉलची मॅच पाहताना सुरुवातीला नेहमी फॉर्मेशन दाखवतात. त्यात ४-४-२ ,४-२-३-१ असे आकडे असतात. फुटबॉल प्रेमींना या आकड्यांचा अर्थ बरोबर कळतो. मात्र दर चार वर्षांनी फक्त विश्वकरंडकाच्या वेळी ज्यांचा फुटबॉलशी सबंध येतो अशा अनेकांना हे आकडे नक्की काय दर्शवितात हे माहीत नसते..या लेखातून ती माहिती पुरविण्याचा प्रयत्न…

फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे काय?
फुटबॉलच्या रणनीतीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून जो समजला जातो तो म्हणजे संघाचे फॉर्मेशन (संभ्याव रचना). फुटबॉलमध्ये संघाचे फॉर्मेशन हा संघाचा मॅनेजर किंवा प्रशिक्षक ठरवतो. फॉर्मेशनमुळे संघातील खेळाडूंना त्यांची संघातील भूमिका आणि जागा स्पष्ट होते. फॉर्मेशन संघाची मजबूत आणि कमकुवत बाजू पाहून बनवली जाते ज्याने संघाचा जास्तीत जास्त मजबूत भाग उपयोगात येऊन विजयाची संधी निर्माण होईल. फॉर्मेशनने संघाची, प्रशिक्षकाची कल्पना आणि शैली अधोरेखित होते.

कसे वाचतात फुटबॉल फॉर्मेशन?

फॉर्मेशन हे डिफेंडर ते अटॅकर असे लिहले जाते ज्यात गोलकिपरचा समावेश नसतो. उदाहरणार्थ ४-४-२ हे फॉर्मेशन म्हणजे ४ डिफेंडर्स, ४ मिडफिल्डर्स, आणि २ फॉरवर्ड्स. फुटबॉलमध्ये एकच फॉर्मेशनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जाते. कोणतेही फॉर्मेशन हल्ला करताना किंवा बचाव करताना वेगवेगळ्या पद्धतीने चालते.

काळानुसार फुटबॉल फॉर्मेशनमध्ये झालेले बदल.

१९व्या शतकात फॉर्मेशनमध्ये प्रत्येकी एक एक डिफेंडर आणि मिडफिल्डर आणि तब्बल ८ फॉरवर्ड (१-१-८) खेळाडू खेळायचे. ऑफसाईडचा नियम नसल्याने हे फॉर्मेशन शक्य होते. त्यात हळू हळू बदल होत ते १-२-७ आणि २-३-५ वर आले. २-३-५ ला त्याच्या दिसण्याच्या आकृतीमुळे पिरॅमिड असे पण संबोधले जायचे. १९२५ साली ऑफसाईडच्या नियमात महत्वपूर्ण बदल झाले आणि फॉर्मेशन ३-२-२-३ असे झाले. यालाच त्या काळात W-M म्हणायचे. याचे कारण म्हणजे डिफेंडर्स M तर फॉरवर्ड्स W च्या आकारात दिसायचे. याचा अविष्कार हर्बर्ट चॅपमनया अर्सेनलच्या प्रशिक्षकाने केला.

त्यानंतर ब्राझीलने फुटबॉल फॉर्मेशनमध्ये महत्वाचे बदल केले. त्यांनी ४-२-४ फॉर्मेशनचा वापर केला आणि याचाच परिणाम म्हणजे त्यांनी १९५८ चा विश्वचषक आपल्या नावे केला. त्यानंतर १९७०च्या विश्वचषकात त्यांनी पुन्हा याचा वापर करत विश्वचषक जिंकला.

यानंतर इंग्लंडने पहिल्यांदा फॉरवर्ड-विंगर खेळवले नाही आणि फुटबॉल विश्वात ४-३-३ हे फॉर्मेशन आणले जे ४-१-३-२ ला पर्याय होते. आता फुटबॉल विश्वात ४-४-२, ४-४-१-१, ४-३-३, ४-५-१, ४-२-३-१ हे फॉर्मेशन जास्त प्रमाणात वापरले जातात.

आधुनिक फुटबॉल विश्वात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या काही फॉर्मेशन्स बद्दल माहिती :-

४-४-२ (४ डिफेंडर्स, ४ मिडफिल्डर्स, २ फॉरवर्ड) :-
१९८० ते २००० साली हे फुटबॉल मधील सर्वात जास्त वापरले जाणारे आणि मूलभूत फॉर्मेशन होते. यात मिडफिल्डर्स आणि डिफेंडर्सला दोन्ही म्हणजे बचाव आणि आक्रमण करावे लागत होते त्यामुळे हे खेळाडूंसाठी त्रासदायक होते. हे फॉर्मेशन प्रतिहल्ल्यासाठी उत्तम असल्याने यात विंगर्सवर जास्त प्रमाणात सामना अवलंबून असायचा. आता हे फॉर्मेशन जरी खूप कमी संघ वापरात असले तरी हे पूर्ण मैदान व्यापून घेण्यासाठी सर्वोत्तम आहे.

४-४-१-१ (४ डिफेंडर्स, ४ मिडफिल्डर्स, १ आक्रमक मिडफिल्डर, १ फॉरवर्ड) :-
४-४-२चे थोडे आधुनिक रूपांतर म्हणजेच ४-४-१-१. यात ४ मिडफिल्डर्स आणि १ फॉरवर्डच्यामध्ये १ खेळाडू असतो जो दोन्ही स्थानावर खेळून संधी निर्माण करायचे किंवा संधीचे गोलमध्ये रूपांतर करायचे प्रयत्न करतो.

४-३-३ (४ डिफेंडर्स, ३ मिडफिल्डर्स, ३ फॉर्वर्डस) :-
ऊरुग्वेने १९५० साली पहिल्यांदा याचा वापर विश्वचषकात केला. १ बचावफळीतील मिडफिल्डर आणि २ आक्रमक मिडफिल्डर यात वापरतात तर ३ फॉरवर्ड सतत आपली जागा बदलत असतात ज्याने समोरच्या संघाला बचाव करताना अडचण होते. ४-१-३-२चे हे आधुनिक रूप आहे. हे फॉर्मेशन वापरणारे सर्व संघ एक बचाव करणारा मिडफिल्डर वापरतात तर २ मिडफिल्डर आक्रमक स्थानी असतात जे स्ट्रायकरचे पण काम करतात.

४-५-१ (४ डिफेंडर्स, ५ मिडफिल्डर्स, १ फॉरवर्ड) :-
मध्यमफळीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या या फॉर्मेशनमध्ये विंगर्सचा सहभाग महत्वाचा असतो. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी हे फॉर्मेशन सर्वोत्तम मानले जाते. ५ मिडफिल्डर्समुळे सामन्यात विरोधी संघाला बॉलवर ताबा मिळवण्यात यश मिळत नाही. परंतु एकच आक्रमक खेळाडू असल्याने मिडफिल्डर्सला संधी निर्माण करावी लागते.

४-२-३-१ (४ डिफेंडर्स, ५ मिडफिल्डर्स, १ फॉरवर्ड) :-
हे फॉर्मेशन स्पेन, फ्रेंच आणि जर्मनच्या संघात जास्त पाहायला मिळते. हे दिसायला जरी बचावात्मक दिसत असले तरी यात तेच खेळाडू ठेवून करता येतात. विंगर्समुळे हे फॉर्मेशन ४-५-१ किंवा ४-४-१-१ असे दिसते. जगजेत्ता संघ जर्मनी सुद्धा हेच फॉर्मेशन वापरतात. ब्राझीलसाठी सुद्धा हे फॉर्मेशन ४-२-४ चा पर्याय आहे. या फॉर्मेशनची सर्वात जमेची बाजू म्हणजे “डबल पिव्हट”. म्हणून सर्व संघ या फॉर्मेशनला पसंदी देतात.

डबल पिव्हट म्हणजे काय?
पिव्हट म्हणजे असा खेळाडू जो डिफेन्स आणि मिडफिल्डमध्ये खेळतो. त्याचे काम बॉल विरोधी संघाच्या कमकुवत बाजूला स्वतःच्या संघाकडे द्यायचा. किंवा स्वतःच्या संघाची मजबूत बाजू पाहून तिथे बॉल देणे आणि संघाच्या डिफेन्सचे संरक्षण करणे तसेच विरोधी संघाच्या आक्रमणाला मध्यमफळीतच थांबवणे. ४-२-३-१ मध्ये २ खेळाडू पिव्हट म्हणून खेळतात.