खेळ कबड्डी भाग-१: लीग …?

आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळते. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन सगळीकडे स्पर्धा वाढली आहे. क्रीडाक्षेत्रात सुद्धा खेळाडूमध्ये स्पर्धा पाहायला मिळते पण जगभरात खेळाच्या लीग वाढल्यामूळे वेगवेगळ्या खेळामधील स्पर्धा वाढली आहे. जगभरात विविध खेळाच्या लीग होऊ लागल्या आहेत.

“कबड्डी” म्हटलं की सध्या एकच चर्चा असते ती म्हणजे प्रो कबड्डीची. भारतातच नाहीतर जगभरात कबड्डीची लोकप्रियता वाढली आहे. कबड्डी खेळाला लोकप्रियता मिळून देण्यामध्ये मोलाचा वाटा आहे तो प्रो कबड्डी लीगचा. आतापर्यंत झालेल्या चार हंगामामुळे कबड्डी खूप पुढे गेली आहे. यावर्षी जुलैमध्ये सुरू झालेली प्रो कबड्डी लीग पर्व ५ ही भारतीय खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठी लीग आहे. प्रो कबड्डीबद्दल जाणून घेण्याआधी लीग म्हणजे नक्की काय? ते बघू.

आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय सर्व खेळाच्या अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धा फक्त क्रीडा असोसिएशन आणि क्रीडामंत्रालयाच्या मान्यतेने आयोजित केल्या जातात. खेळाच्या लीग म्हणजे नक्की काय? क्रीडा असोसिएशनच्या मान्यतेने काही खाजगी कंपन्या आणि संस्था एखाद्या खेळाची स्पर्धा आयोजित करतात त्याला लीग म्हणतात. लीग स्पर्धेच दुसरं नाव म्हणजे व्यावसायिक लीग.

लीग मध्ये खेळणारे संघ कोणत्याही क्रीडा असोसिएशनशी सलग्न नसतात. सर्व संघाची मालकी वेगवेगळ्या खाजगी संस्था किंवा व्यक्तीकडे असते. लीग मधील खेळाडूंना लिलाव करून काही ठराविक कालावधीचा करार करून खरेदी केले जातात. लीग स्पर्धामध्ये पैशाची खूप उलाढाल होते. विविध कंपन्या स्पर्धेसाठी पैसे देऊन आपल्या कंपनीची जाहिरात करतात. लीग स्पर्धेमूळे खेळाची आणि खेळाडूंची लोकप्रियता वाढते.

जगभरात विविध खेळांच्या लीग खेळवल्या जातात. अमेरिकेत नॅशनल फुटबॉल लीग, तर इंग्लंडमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग आणि नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन लीग अमेरिका आणि कॅनडा या देशांत खेळवली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बश लीग, इंग्लडमध्ये नेटवेस्ट T20 लीग, साऊथ आफ्रिकेत रॅम स्लॅम प्रीमियर लीग अश्या अनेक लीग जगभरात खेळवल्या जातात.

भारतात सर्वप्रथम इंडियन प्रीमियर लीग (क्रिकेट) लीगची सुरुवात झाली.आतापर्यंत आयपीएलचे दहा पर्व झाले आहेत. भारतात बहुतेक खेळाच्या लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. हॉकी इंडिया लीग, इंडियन सुपर लीग, “प्रो कबड्डी लीग,” प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळवल्या जात आहेत. त्यामुळे भारतातील खेळाडूंना आपला खेळ दाखवायची संधी उपलब्ध झाल्या आहेत. लीग स्पर्धामूळे खेळाडू खेळाकडे करियर म्हणून बघू लागले आहेत.लिग स्पर्धामुळे खेळाकडील लोकांची रुची वाढली आहे. लीग स्पर्धामुळे दिवसेंदिवस क्रीडाक्षेत्राचा दर्जा वाढला आहे.

पुढील भाग-२: सुरुवात प्रो कबड्डी लीगची

-अनिल विठ्ठल भोईर
(लेखक कब्बडी अभ्यासक असून कबड्डी पंच म्हणून देखील काम पाहतात)