काय आहे ही यो यो फिटनेस टेस्ट ?

0 86

भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग आणि सुरेश रैना या दोन क्रिकेटपटूंना श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आले. चार दिवसांनी या दोन क्रिकेटपटूंना का वगळण्यात आले याचे कारण पुढे आले. ते अर्थात हे दोन खेळाडू यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे.

एमएस धोनी, विराट कोहली, मनीष पांडे आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे दिग्गज या टेस्टमध्ये अपेक्षापेक्षा जास्त गन मिळवत असताना हे क्रिकेटपटू का ते करू शकले नाही हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला. अशी अशी कोणती टेस्ट आहे ज्यामुळे युवराज सारख्या एकवेळच्या चपळ खेळाडूला भारतीय संघातील स्थान नाकारण्यात आले याची चर्चा सुरु झाली. म्हणूनच महा स्पोर्ट्सने याचा घेतलेला हा आढावा…

यो यो एन्ड्युरन्स टेस्ट म्हणजे नक्की काय ?
टॉपएन्ड स्पोर्ट्स वेबसाइटनुसार यो यो एन्ड्युरन्स टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ जेन्स बँग्सबो यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला आहे. यात लेवल १ आणि २ असे प्रकार आहेत.

लेवल १ हा प्रकार अगदी बीप टेस्ट सारखाच आहे परंतु २ मध्ये एकदम वेगाने धावणे आणि वेळोवेळी त्यात वाढ करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. यात २० मीटर अंतरावर मार्किंग कॉन्ज ठेवले जातात. यात सुरुवातीला हळू हळू सुरु होणारे धावणे बीपच्या आवाजाप्रमाणे वाढत जाते. यात सर्व काम आजकाल सॉफ्टवेअरच्या मदतीने केले जाते.

ही टेस्ट लेवल १ साठी ६ ते २० मिनिटे तर लेवल २ साठी २ ते १० मिनिटे चालते.

कोणत्या खेळात ही पद्धत वापरली जाते?
गेली अनेक वर्ष फुटबॉल खेळासाठी ही पद्धत वापरली जाते. हॉकीमध्येही ही पद्धत वापरली जाते. फुटबॉल आणि हॉकी सामन्यातील यो यो टेस्टचे निकाल हे क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आजकाल प्रो कबड्डीचा सराव करतानाही कबड्डीपटू ही पद्धत वापरताना दिसतात.

कोणता क्रिकेट खेळणारा देश यात सर्वात पुढे आहे?
क्रिकेटपटूंसाठी यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये १९.५ हा उत्तम स्कोर समजला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यात अग्रस्थानी असून त्यांचा साधारण स्कोर हा २१ असतो.

भारतीय खेळाडूंमध्ये कुणाचा आहे यो यो स्कोर सर्वात जास्त?
श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील मनीष पांडे या खेळाडूचा यो यो स्कोर सर्वात जास्त आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजाचा क्रमांक लागतो. भारतीय संघातील हे खेळाडू बऱ्याच वेळा २१ च्या आसपास जातात.

जो रूट काय म्हणतो यो यो टेस्ट बद्दल?
“ही पद्धत खूप उत्तम आहे असं काही नाही. परंतु १०-२० मिनिटांनंतर कष्ट घेतल्यावर आपण आराम करू शकतो. ” असे इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणतो.
इंग्लंडचा माजी कर्णधार ३२ वर्षीय अॅलिस्टर कूक यो यो टेस्ट दरम्यान अंदाजे ३१२० मीटर अंतर धावतो तर जॉनी बेअरस्टो अंदाजे ३००० तर जो रूट २७६० मीटर यानंतर धावतो.

९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंचा यो यो टेस्टमधील स्कोर
पूर्वीच्या काळात बीप टेस्ट ही एक खेळाडूंमध्ये एक फॅशन होती. भारतीय खेळाडू त्यावेळी या टेस्टमध्ये अंदाजे १६ ते १६.५ स्कोर करत असत. यात मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंग आणि अजय जडेजा आघाडीवर असत.

भारतीय संघाच फिटनेस बद्दलच धोरण
भारतीय संघात यापुढे निवड होताना कौशल्य हा एकमेव पात्रता यापुढे असणार नाही याचे स्पष्ट संकेत निवास समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. संघात निवड होण्यासाठी फिटनेसला प्राधान्य राहणार असून त्यांनतर कौशल्याचा विचार केला जाणार आहे.
लेखकाची भूमिका:
१९९० सालातील क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यात खूप बदल झाले आहेत. आजचे क्रिकेट हे अतिशय वेगवान झाले आहे. गेल्या वर्षभरात भारतीय क्रिकेट संघ अंदाजे ४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्यात विराट कोहली सारखे खेळाडू जवळजवळ ४० सामने खेळले आहेत. खेळाचा वेग आणि खेळाचे प्रमाण दोन्ही सध्याच्या काळात वाढले आहेत. त्यामुळे फिटनेस हा सर्वात मोठा मुद्दा आहे ज्यावर तडजोड करणे भारतीय संघाला नक्कीच परवडणारे नाही.

त्यासाठी यो यो एन्ड्युरन्स टेस्ट या फुटबॉलमधील फिटनेस टेस्टचा वापर करणे ही एक चांगली गोष्ट आहे. नवीन संकल्पनांचा कायमच संघाने स्वीकार करायला हवा जेणेकरून आपण कोणत्याही संघापेक्षा मागे राहणार नाही. भारतीय संघातील विराट कोहली, एमएस धोनी, रवींद्र जडेजा या खेळाडूंच्या देहबोलीतून ही गोष्ट कायमच दिसते. त्यातून दुसरा फायदा म्हणजे त्यांचे चाहते देखील आजकाल फिटनेसला महत्त्व देऊ लागले आहे. शेवटी खेळातून समाजात एक चांगला संदेश जात असेल तर ही नक्कीच एक चांगली बाब आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: