Video: दुसऱ्या वनडेत बुमराहबरोबर झाला हा हास्यास्पद किस्सा!

सेंच्युरियनला ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बाबतीत एक मजेदार किस्सा घडला.

भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर १८.२ षटकात जे पी ड्युमिनीने एक चांगला फटका मारला. त्याने मारलेला हा चेंडू सीमारेषेजवळ आडवताना जसप्रीत बुमराहाला स्वतःच्याच बुटांमुळे खरचटले गेले. त्यावेळेस त्याच्यावर उपचार करण्यासाठी  रघु हे भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ सदस्य मैदानावर आले.

बुमराहला किरकोळ खरचटले असल्याने रघु यांनी त्याला औषध लावले पण स्टेडियम कर्मचाऱ्यांना बुमराहची दुखापत किती गंभीर आहे हे न कळल्याने ते त्याच्यासाठी स्ट्रेचर घेऊन आले. पण त्यांना स्ट्रेचर घेऊन येताना पाहून बुमराह आणि रघु यांना हसू आवरले नाही. त्यानंतर त्यांनी स्ट्रेचरची गरज नसल्याचे सांगितले.

या सामन्यात नंतर बुमराहने गोलंदाजी देखील केली. तसेच भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सने दमदार विजय मिळवला होता. या विजयाबरोबरच भारताने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना उद्या केपटऊनला खेळवण्यात येणार आहे.