Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला

भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने मंगळवारी(4 डिसेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो जवळजवळ मागील दोन वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. पण तो देशांतर्गत क्रिेकेट आणि आयपीएलमध्ये खेळत होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वाच्या काळात गंभीर भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. तसेच त्याने  2007 चा टी20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2009 ला कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाचाही तो भाग होता.

त्याचबरोबर 2009 हे वर्ष गंभीरसाठी खास ठरले होते. या वर्षातील आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही गंभीरला देण्यात आला होता. याबरोबरच 2009मध्येच गंभीर आणि सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत एक खास गोष्ट पहायला मिळाली होती. गंभीरने त्याला मिळालेल्या सामनावीराची ट्रॉफी विराटला दिली होती

झाले असे की 24 डिसेंबर 2009 ला भारत  विरुद्ध श्रीलंका संघात इडन गार्डन, कोलकता येथे चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 315 धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेकडून उपुल थरंगाने 118 धावांची आणि कुमार संगकाराने 60 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर भारतासमोर 316 धावांचे लक्ष्य असताना विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकर यांची सलामी जोडी लवकर बाद झाली. त्यामुळे फलंदाजीला गंभीर आणि विराट उतरले. या दोघांनीही भारताचा डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी 224 धावांची द्विशतकी भागीदारीही रचली.

भारताचा हा डाव सावरताना गंभीर आणि विराट दोघांनीही शतके केली. विराटचे हे पहिलेच वनडे शतक होते. पण विराट 107 धावा करुन बाद झाला. त्या्ला सुरज रणदिवने बाद केले.

विराट बाद झाल्यानंतरही गंभीरने दिनेश कार्तिकला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात गंभीरने नाबाद 150 धावांची दिडशतकी खेळी केली होती.

त्यामुळे सामना संपल्यानंतर रवी शास्त्रींनी गंभीरला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी बोलावले. पण गंभीरने हा पुरस्कार नाकारत तो 21 वर्षीय युवा फलंदाज कोहलीला दिला. कारण विराटने त्याचे पहिले वनडे शतक केले होते, त्यामुळे त्याचे कौतुक आणि त्यावेळीच्या धैर्याबद्दल त्याला गंभीरने ही खास भेट विराटला देऊ केली होती.

त्यावेळी गंभीरने सामना संपल्यानंतर म्हटले होते की, ‘आम्ही पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. त्यावेळी तो सकारात्मक खेळला आणि त्याने जलद धावा करत मला चांगली साथ दिली होती. विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे माझ्या खांद्यावरचे मोठे ओझे हलके झाले.’

‘आम्ही स्वत:ला सांगितले होते की 35 व्या षटकानंतर काय होते ते पाहूया, पण नंतर आम्हाला पॉवरप्ले घ्यायची गरज लागली नाही. मला मागील दोन सामन्यात अपयश आले होते. पण आज माझ्या खेळीमुळे आम्हाला मालिका जिंकण्यात मदत झाल्याचा आनंद आहे. इडन गार्डनवर शतक करण्याचा आनंद विलक्षण आहे.’

गंभीरच्या या कृतीमुळे त्याच्यातील दिलदारपण सर्वांना दिसला होता. हा सामना भारताने 11 चेंडू बाकी ठेवत 7 विकेट्सने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने उपकर्णधारालाच दिला डच्चू

सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?

अॅडलेड कसोटीसाठी अंतिम १२ जणांच्या टीम इंडियामध्ये या खेळाडूंना मिळाले स्थान