तामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये !

चेन्नई: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने रविवारी मदुराईच्या मंदिराला भेट दिली. या आठवड्यात तामिळनाडू प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. या राज्यात हेडन खूप लोकप्रिय आहे. मंदिराच्या भेटीनंतर त्याने तामिळनाडूतील स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला, ज्यात मटण बिर्याणी, तळलेले चिकन, तळलेले खेकडे, खेकड्याचं आमलेट इत्यादी पदार्थ होते.

यानंतर हेडनने दिवसात अनेक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गांधी स्मारक संग्रहालयाच्या कार्यक्रमाला हेडनने पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि दक्षिणेकडे पारंपरिक मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान केले होते. मंचावर जाताना हेडनला प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांबरोबर तामिळ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न ही त्याने केला.

खूप जास्त जेवण केल्यानंतरही हेडनने इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. वयाच्या ४५व्या वर्षी ही हेडन तंदुरुस्त आहे हे त्याने पुशअप्स स्पर्धा जिंकून दाखून दिले. त्याने त्याच्यापेक्षा निम्या वयाच्या तरुणांनाही लाजवले एवढे पुशअप्स काढून दाखवले. एवढेच नाही तर त्याने रजनीकांतचे काही डायलॉग्स बोलून दाखवायचा ही प्रयत्न केला.

२२ जुलैपासून तामिळनाडू प्रीमियर लीगचे दुसरे संस्करण सुरू होत आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना गतविजेते टुटी पॅट्रिओट्स आणि डिंडिगुल ड्रेगनसह यांच्या मध्ये होणार आहे. या हंगामात २२ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ सामने खेळले जातील.