कधी होणार किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल

आज भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहचला. त्यामुळे साहजिकच हा खेळाडू जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कधी पटकावेल याचे वेध आता बॅडमिंटनप्रेमींना लागले आहेत.

१४ नोव्हेंबरपासून सुरु होणारी चायना ओपन सुपरसिरीज प्रीमियर स्पर्धा जर किदांबी जिंकला तर तो अव्वल स्थानी येऊ शकतो.

१९९० सालापासून संगणकावरील क्रमवारीला सुरुवात झाली आणि तेव्हापासून भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूमध्ये पुल्लेला गोपीचंद यांनी सर्वात चांगले अर्थात क्रमवारीत ४थे स्थान मिळवले होते. त्यापूर्वी ८०च्या दशकाच्या सुरुवातीला प्रकाश पदुकोण हे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाले होते.

श्रीकांतने यापूर्वीच गुरु गोपीचंद यांना विक्रम जून २०१५ मध्ये मोडत तिसरे स्थान पटकावले होते.

जरी तो चायना ओपन सुपरसिरीज प्रीमियर स्पर्धेत अपयशी ठरला तरी त्याला याची भरपाई हाँगकाँग आणि दुबई सुपर सिरीज स्पर्धेत करता येईल.

अशी आहेत समीकरणे
-जर श्रीकांत आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला व्हिक्टोर क्सेल्सन यांच्यातील चायना ओपन सुपरसिरीज प्रीमियर स्पर्धेत किदांबी श्रीकांत जिंकला तर तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी जाऊ शकतो.

– याच स्पर्धेत जर व्हिक्टोर क्सेल्सन पेक्षा पुढच्या फेरीत श्रीकांत गेला तरीही तो अव्वल स्थानी येऊ शकतो. यावेळी तो कमीतकमी उपांत्यपूर्व फेरीत गेला पाहिजे.

सध्या श्रीकांत नागपूर येथे होत असलेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा आजपासून सुरु होत आहे.