कोण आहे हा लुंगी? का होतेय एवढी चर्चा?

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी या खेळाडूने पदार्पण केले. जखमी डेल स्टेन या खेळाडूच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले.

त्याचे हे पदार्पण अनेक अर्थांनी खास ठरले. तो दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात १ धावेवर नाबाद राहिला तर भारताच्या पहिल्या डावात त्याने मोठा कारनामा करताना त्याने चेतेश्वर पुजाराला शून्य धावेवर धावबाद केले. चेतेश्वर पुजारा ५५ कसोटीच्या कारकिर्दीत प्रथमच ‘गोल्डन डक’ अर्थात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

चेतेश्वर पुजाराला धावबाद करताना लुंगी एन्गिडीने दाखवलेली चपळता आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य अफलातून होते.

त्यानंतर सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वाधिक मोठी कारकीर्द असणाऱ्या (१५ वर्ष आणि ५ महिने) पार्थिव पटेलला पदार्पणातच लुंगीने बाद केले. विशेष म्हणजे आपल्या ९ षटकांत त्याने २ षटके निर्धाव टाकताना केवळ २६ धावा दिल्या.

या खेळाडूचा गोलंदाजीचा वेगही चांगला आहे. तसेच त्याने या सामन्यात डेल स्टेनची कमी कुठेही जाणवू दिली नाही हे विशेष. हा खेळाडू काल भारतात सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला गेला. विशेष म्हणजे तो ट्विटरवर बराच काळ ट्रेंडिंग होता.