कोण आहे हा रघु???

भारताचा कसोटी सलामीवीर केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यामध्ये सुरु असलेल्या संवादा दरमण्यान केएल राहुलने त्याच्या कारकिर्दीमधील यशाचे श्रेय रघु श्रीनिवासन या व्यक्तीला दिले आणि मोठ्या प्रमाणावर या व्यक्तीबद्दल अचानक चर्चा सुरु झाली.

अगदी राहुल द्रविड ते केएल राहुल यांना ज्याच्या गोलंदाजीचा सामना करावा लागला तो रघु श्रीनिवासन हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएमध्ये गोलंदाजीचा मार्गदर्शक किंवा सहाय्यक ट्रेनर म्हणून गेली बरेच वर्ष काम पाहतो.

डीएनए मधील एका वृत्तानुसार या रघुला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं होत म्हणून घरातील सर्व वडीलधाऱ्यांच्या विरोध पत्करून तो मुंबईला आला. त्याला रमाकांत आचरेकर सर यांच्याकडून मार्गदर्शन हवं होत.

एका शिक्षकाचा मुलगा असणारया रघूला पहिल्यापासूनच एक क्रिकेटपटू बनायचं होत. १५ वयाचा असताना त्यामुळेच त्याने १२वी पूर्ण करून शिक्षण सोडले. मुंबईला गेल्यावर त्याचा हा प्रवास ३ वर्ष सुरु होता परंतु त्यात त्याला काही यश आले नाही. शेवटी बस पकडून त्याने थेट हुबळी गाठले. तिथे त्याने अनेक क्लबसाठी क्रिकेट खेळले परंतु त्यातही यश आले नाही. शेवटी त्याने बेंगलोर गाठले.
२००५ च्या आसपास रघूची कुणीतरी इरफान सैत या प्रशिक्षकाशी ओळख करून दिली. सुरुवातीला रघु क्रिकेट खेळणे आणि इरफान यांना मदत करणे अशी दोन्ही काम करत होता. त्यादरम्यान त्याचा प्रवास चिन्नास्वामी स्टेडियमवर होऊ लागला. जेव्हा जेव्हा इरफान यांना भारतीय संघ किंवा रणजी संघ यांच्याकडून सरावासाठी गोलंदाजांची मागणी होत तेव्हा ते रघुला तिकडे पाठवत असत.

खेळाडूंच्या सांगण्यानुसार आणि अधिकारी वर्गाने रघु करत असलेल्या कष्ट पाहून एक दिवस त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे नोकरी मिळालीच. अगदी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्र सिंग धोनी पासून ज्या ज्या खेळाडूंनी भारताकडून क्रिकेट खेळले आहे त्यांनी एकदातरी रघुच्या थ्रो डाउनचा सामना केलाच आहे.

रघूच्या जीवनातील सर्वात मोठी घटना ही त्याला २०११ साली भारतीय संघाबरोबर सहाय्यक म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यात आले ती होती. तेव्हापासून आजपर्यंत रघु सतत भारतीय संघाबरोबर असतो. तो सहाय्यक ट्रेनर म्हणून भारतीय खेळाडूंना मदत करतो. मुख्य करून रघु हा भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसतो.

केएल राहुलच्या बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो की फलंदाजाला जेवढे अवघड किंवा कष्ट पडेल तेवढी वेगवेगळी गोलंदाजी किंवा थ्रो डाउन रघु करतो. जेव्हा केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे होता तेव्हा रघु त्याला अतिशय वेगवेगळे चेंडू टाकत असे जेणेकरून तो कोणत्याही चेंडूंचा सामना करू शकेल.

फक्त क्रिकेट खेळून नाव करता येत किंवा देशासाठी क्रिकेट खेळणे ही एकमेव मोठी गोष्ट आहे असे वाटणाऱ्यांना रघु हे एक उदाहरण आहे. कोणत्याही गोष्टीतून खचून न जाता योग्य कष्ट घेतले तर क्रिकेटचा देव मानणाऱ्या सचिन तेंडुलकरला किंवा भारताची वॉल म्हणवल्या जाणाऱ्या राहुल द्रविडलाही तुम्ही थ्रो डाउन अर्थात नेटमध्ये गोलंदाजी करू शकता हेच रघुचे उदाहरण सर्वांना सांगते.