का विराटला सलामीची जोडी निवडणे जाणार कठीण?

गॅले: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने परदेशातील सर्वात मोठा विजय मिळवला. यजमान श्रीलंकेला तब्बल ३०४ धावांनी भारतीय संघाने पराभूत केले.

खराब कामगिरी झाल्यावर नेहमीच कोणत्या खेळाडूने खराब कामगिरी केली याची चर्चा होते. परंतु सध्या भारतीय संघात चर्चा सुरु आहे ती कोलंबो येथे होणाऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून कुणाला संधी द्यायची याची.

भारताने या दौऱ्यात २ पूर्णवेळ सलामीवीर म्हणून मुरली विजय आणि केएल राहुल यांची निवड केली होती. तर ‘बॅकअप ओपनर’ म्हणून संघात अभिनव मुकुंदला स्थान देण्यात आले होते. परंतु ऐनवेळी मुरली विजय दुखापतीमधून बरा न झाल्यामुळे शिखर धवनला संघात स्थान देण्यात आले. सामना सुरु होण्याच्या आधीच्या दिवशी केएल राहुल तापामुळे कसोटीमधून बाहेर पडला आणि जे दोन खेळाडू बॅकअप म्हणून संघाबरोबर गेले त्या दोंन्ही खेळाडूंना संघात खेळण्याची संधी मिळाली.

विशेष म्हणजे या दोनही खेळाडूंनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पडली. शिखर धवन जो खरा तर दुसरा बॅकअप सलामीवीर म्हणून संघाबरोबर गेला होता त्याने पहिल्या डावात १९० धावांची खेळी केली आणि तोच सामनावीर ठरला.

अभिनव मुकुंदने गेल्या काही डावांतील अपयश भरून काढत दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी केली. खरं तर आधी बॅकअप ओपनर होता परंतु मुरली विजयच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे पूर्णवेळ सलामीवीर म्हणून पहिले गेले.

गेल्या मार्च महिन्यापासून केएल राहुल एकही सामना खेळू शकला नाही. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या या पूर्णवेळ सलामीवीराच्या गेल्या ६ डावात ६ अर्धशतकी खेळी आहेत. १०, ६४, ९१, ९०, ६७, ५१, ६० अशा त्याने गेल्या ७ डावात खेळी केल्या आहेत.

संघात रोहित शर्माही आहे. जो कसोटीमध्ये कोणत्याही स्थानावर खेळू शकतो. रोहितने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्याला तशी संधी मिळणे अवघडच आहे.

आता खरी कसोटी आहे भारतीय कर्णधार विराट कोहलीची. तो पुढच्या सामन्यात सलामीवीर म्हणून कुणाला संधी देईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.