विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?

मेलबर्न। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 26 डिसेंबरपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासमोर सलामीच्या फलंदाजीचा मोठा प्रश्न उभा आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मुरली विजय हे दोघेही अपयशी ठरले आहेत. तसेच मागील अनेक सामन्यांमध्ये त्यांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

त्यातच भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पुन्हा मायदेशात परतला आहे. त्याच्या ऐवजी उर्वरित कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मयंक अगरवालची निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला सलामीच्या फलंदाजीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. या कसोटीआधी भारतीय संघासमोर मुरली विजय आणि केएल राहुल व्यतिरिक्त सलामीला फलंदाजी करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.

रोहित शर्मा – मेलबर्न कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा हा एक पर्याय भारतासमोर आहे. रोहित मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव देखील आहे.

तो या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी दुखापतग्रस्त झाला होता. पण तो आता पूर्ण बरा झाला आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 37 धावांची खेळी करताना चेतेश्वर पुजारासह चांगली भागीदारी केली होती.

पण त्याने आत्तापर्यंत कसोटीमध्ये कधीही सलामीला फलंदाजी केली नाही. त्याने वनडेमध्ये सलामीला फलंदाजी करताना 109 सामन्यात 58.37 च्या सरासरीने 5487 धावा केल्या आहेत. ही वनडेतील आकडेवारी पाहता रोहितला कसोटीत सलामीला एकतरी संधी द्यायला हवी.

मयंक अगरवाल – शॉ ऐवजी भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या मयंकला मेलबर्न कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यात अफलातून कामगिरी केली आहे.

जर त्याला या कसोटी सामन्यात संधी मिळाली तर हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना ठरेल. मयंकने भारत अ संघाकडून खेळतानाही चांगली कामगिरी केली आहे.

त्याचा नुकत्याच भारत अ संघाने केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही भारतीय संघात समावेश होता. या दौऱ्यात त्याने दोन कसोटी आणि दोन वनडे अशा चार सामन्यात मिळून 39.60 च्या सरासरीने 198 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.

त्याचबरोबर 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या मोसमात 13 डावात 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या होत्या.

पार्थिव पटेल – मेलबर्न कसोटीसाठी पार्थिव पटेल हा देखील सलामीला फलंदाजीसाठी एक पर्याय आहे. तो सध्या भारतीय संघातील सर्वात सिनियर खेळाडूदेखील आहे. तसेच त्याच्याकडे आॅस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने 2004 मध्ये आॅस्ट्रेलिया दौरा केला आहे.

त्यामुळे जर त्याला मंयकसह सलामीची संधी मिळाली तर लेफ्ट-राइट(डावकरी आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज) अशी जोडी सलामीला मिळेल, ज्यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करताना त्रासदायक होऊ शकते.

त्याचबरोबर पार्थिव हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे जर त्याला मेलबर्न कसोटीत संधी मिळाली तर रिषभ पंतला बाहेर बसावे लागू शकते. त्याच्या ऐवजी दुसऱ्या फलंदाजाला संधी मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी भारतीय संघाने केला कसून सराव

हार्दिक पंड्याने काढलेला टीम इंडियाचा सर्वोत्तम सेल्फी पाहिला का ?

चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार