रोहित बरोबर आज हा खेळाडू येणार सलामीला

कोलंबो । येथे होत असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन ऐवजी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. शिखर धवन आईची तब्येत बिघडल्यामुळे पाचवा वनडे सामना आणि ६ सप्टेंबरला होणारा टी २० सामना सोडून भारतात परतणार आहे.

कोणत्याही दौऱ्यात खेळाडू दुखापग्रस्त किंवा खाजगी कारणामुळे दौरा सोडून परत आला तर त्या जागी संघ व्यवस्थापन बदली खेळाडूची मागणी करते. परंतु भारतीय व्यवस्थापनाने असा कोणताही निर्णय घेतला नाही. सध्याचे भारतीय खेळाडूंचे श्रीलंका दौऱ्यावर स्काड जर पहिले तर भारतीय संघाबरोबर अजिंक्य रहाणे हा एकमेव सलामीवीर उरला आहे.

विंडीज मालिकेत सर्वाधिक धावा करूनही त्याला या मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळेच त्याला या दोन सामन्यात नक्की संधी मिळणार आहे. संघव्यवस्थापनानेही तोच विचार करून बदली खेळाडूची मागणी केली नसणार आहे. ६२, १०३, ७२, ६०, ३९ या रहाणेच्या विंडीज दौऱ्यातील खेळी आहेत.

६ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ह्या खेळाडूला केवळ ७८ वनडे सामने खेळायला मिळाले आहेत. या काळात भारतीय संघ तब्बल १४३ वनडे सामने खेळला असून त्यातील केवळ ५०% सामन्यात रहाणेला भारताकडून भाग घेता आला आहे. याच काळात कर्णधार कोहली १३४ सामन्यात, एमएस धोनी ११४, सुरेश रैना १०३, आर अश्विन १००, रोहित शर्मा ९६ सामन्यात, शिखर धवन ८५ सामन्यात यांनी भारताकडून सार्वधिक सामने खेळले आहेत.