म्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट !

सध्या भारत आणि श्रीलंका संघात क्रिकेट चाहत्यांना सतत मालिका बघायला मिळत आहे. नुकताच भारताने श्रीलंकेला १-० ने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत काल हरवले आहे. तसेच येत्या १० तारखेपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरु होणार आहे आणि त्यानंतर टी २० मालिका. त्यामुळे या दोन संघात सतत मालिका का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

याबाद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे, की श्रीलंकेसाठी भारताबरोबर खेळणे आर्थिक दृष्ट्या चांगले आहे परंतु बीसीसीआयची हे नुकसानीचे असले तरी ते अपरिहार्य आहे कारण एका वर्षात किती मालिका घ्यायच्या या आधीच ठरलेले असते.

बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलत होते. तेव्हा ते म्हणाले ” पाठोपाठ मालिका घेतल्या जातात कारण याबद्दल आधीच वेळापत्रक ठरलेले असते.”

“यापुढचे आयोजन हे कर्णधाराने नोंदवलेल्या निरीक्षणाला लक्षात घेऊन केले जाईल.” असेही ते पुढे म्हणाले. विराटने स्टेडिअमच्या स्टँडमध्ये रिकाम्या असलेल्या जागांबद्दल निरीक्षण नोंदले आहे

विराट श्रीलंकेबरोबर पाठोपाठ होणाऱ्या मालिकांबद्दल म्हणाला, “चाहत्यांचा उत्साह ही गोष्ट लक्ष्यात घेतली जाईल, कारण तुमचे चाहते दूर गेलेले तुम्हाला आवडणार नाही.” .

“आपल्याला चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी समतोल साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर खेळाडूही ताजेतवाने असले पाहिजे, तसेच क्रिकेटला रोमांचित ठेवले पाहिजे आणि वर्षभर निकोप स्पर्धा राहिली पाहिजे. “

“सामने बघणाऱ्या चाहत्यांना विचारून याबद्दलचे विश्लेषण करायला हवे. खेळ बघणाऱ्यात आणि खेळ खेळणाऱ्यात खूप फरक असतो. आमच्यासाठी आम्ही खेळ खेळणार नाही असे म्हणण्याची संधी नसते.”

“मला माहित नाही की खूप क्रिकेट खेळले जात आहे की नाही किंवा एकाच संघाबरोबर सारखे सामने होत आहे की नाही, पण या सगळ्या गोष्टींची भविष्यात भारताच्या क्रिकेट बोर्डाशी चर्चा होईल.”

भारताने ३ महिन्यांपूर्वीही श्रीलंका दौरा केला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेला तीनही प्रकारात ९-० ने व्हाईटवॉश दिला होता.