म्हणून आशिष नेहराने टाकले शेवटचे षटक

दिल्ली। फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर १ नोव्हेंबरला पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या टी २० सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने शेवटचे षटक टाकले होते. याबद्दल त्याने सामना संपल्यावर समालोचक संजय मांजरेकरांशी बोलताना खुलासा केला आहे. हा सामना नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना होता.

नेहरा म्हणाला “मी भारताकडून खेळताना बऱ्याचदा शेवटचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. शेवटचे षटक टाकताना वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. पण आज असे नव्हते. आज हे खूप सोपे होते. विराटने मला शेवटच्या २-३ षटकाबाबत विचारले होते आणि मी त्याला मी शेवटचे षटक टाकेल असे सांगितले.”

कर्णधार विराट कोहली नेहराबद्दल बोलताना म्हणाला ” जवळ जवळ १९ वर्ष वेगवान गोलंदाज म्हणून खेळणे खूप अवघड असते. मला माहित आहे की तो किती व्यावसायिक खेळाडू आहे आणि तो त्यासाठी किती कष्ट घेतो. तो अश्या प्रकारच्या निरोपाला पात्र आहे जेव्हा चाहते त्याचा उत्साह वाढवत आहेत. आता तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो. त्याला छान कुटुंब मिळाले आहे. आम्ही नेहमी संपर्कात राहू पण आम्हाला त्याची आठवण होईल. मी त्याला शुभेच्छा देतो.”

हा सामना भारतीय संघाने ५३ धावांनी जिंकला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उद्या राजकोट येथे ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.