आशिष नेहरा या कारणामुळे नाही खेळणार आयपीएल !

भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने दोन दिवसांपूर्वीच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय संघ १ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड संघाबरोबर टी २० मालिकेतील पहिला सामना दिल्लीला खेळणार आहे. याच सामन्यात नेहरा निवृत्ती घेणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी २० सामान्याच्या निमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत नेहरा बोलत होता. त्याला पत्रकारांनी त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्याने सांगितले की “मी संघ व्यवस्थापनाशी आणि निवड समितीच्या अध्यक्षांशी यावर चर्चा केली आहे.”

“न्यूझीलंड बरोबरच सामना हा दिल्लीत होणार आहे. ही मोठी गोष्ट आहे की मी माझी निवृत्ती घराच्या मैदानावरील प्रेक्षकांसमोर घेणार आहे जिथे २० वर्षांपूर्वी मी माझा पहिला रणजी सामना खेळलो होतो.”

आयपीएलबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला ” मी मानसिकदृष्ट्या खूप खंबीर आहे. जेव्हा जेव्हा मी सराव केला आहे तेव्हा तेव्हा मी भारताकडून खेळायचा विचार केलाय. मला अनेक लोक विचारतात की मी आयपीएलमधून का निवृत्ती घेतोय. मी सहज आयपीएल खेळू शकतो पण मी जेव्हा जेव्हा खेळायची तयारी करतो तेव्हा तेव्हा मी भारतासाठी खेळायची तयारी करतो”

“मला हे कळलंय की जेव्हा मी १ नोव्हेंबरला निवृत्त होईल तेव्हा आयपीएलच्या आधी माझ्याकडे सहज ५ महिने आहेत खेळण्यासाठी. अगदी मी अजून १ वर्षही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो पण मी माझा निर्णय घेतला आहे एकदा मी क्रिकेट सोडलं तर सोडलं मी त्यानंतर आयपीएलही खेळणार नाही”

“निवृत्ती घेणं अशावेळी चांगले असते जेव्हा लोक त्याबद्दल ‘का नाही’ यापेक्षा ‘का’ असा प्रश्न विचारतात. मला कायम असं वाटायचं कि मी उच्च स्थरावर असताना निवृत्ती घ्यावी.”

“मला असं वाटत की हे योग्य आहे. सध्यातरी पुढे टी २० च्या मोठ्या स्पर्धा होणार नाहीत आणि भुवनेश्वर कुमार चांगली गोलंदाजी करतोय आणि जेव्हा मी आणि बुमराह खेळत होतो तेव्हा भुवी आणि शमी संघाच्या बाहेर होते त्यामुळे मला असं वाटत ही योग्य वेळ आहे. आणि सर्वांनीच माझ्या निर्णयाचे स्वागत केले आहे “

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील वनडे आणि टी २० मालिकेची सुरुवात होणार आहे.