विराटसारखे वागणे संघसहकाऱ्यांसाठी चुकीचे ठरेल – ऍडम गिलग्रिस्ट

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या स्वभावाबद्दल ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍडम गिलग्रिस्टने परखड मत व्यक्त केले आहे. त्याचे म्हणणे आहे की विराटच्यास्वभावाची बाकीच्या संघासहकाऱ्यांकडून नक्कल केली गेली तर ती चुकीची ठरेल. गिलग्रिस्टने एका कार्यक्रमात याबद्दल संवाद साधला आहे.

गिलग्रिस्ट म्हणाला “मी जर या संघात असतो तर मी त्याच्यासारखे मैदानात नसतो. जे तुमच्यात नैसर्गिक आहे आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. याचा असा अर्थ नाही की जो खेळाडू विराट सारखे वागत नाही त्याला त्याबद्दल प्रश्न विचारले जावेत”

“जर हा बहाणा असेल तर तो तुम्हाला एकदिवस खाली आणेल. तुम्ही यात अडकले जाल कारण तुम्ही फक्त भासवण्याचा प्रयन्त केला तर तुम्ही क्रिकेट हा खेळ खेळायचे विसरून जाल.”

गिलग्रिस्ट पुढे म्हणाला “आक्रमकता तुमच्यातून आली पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारे खेळाता त्याबद्दल तुमचे व्यक्तिमत्व खूप काही सांगत असते. विराट हा तापट, उत्साही आणि निश्चयी खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीतून हेच दिसते. याचे प्रतिबिंब त्याच्या नेतृत्वातुन आणि यश मिळवण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीतून दिसते”

काही दिवसांपूर्वीही काहीश्या अश्याच प्रकारचे मत राहुल द्रविडने व्यक्त केले होते.