बेंगाल करणार का विजयी सुरवात ?

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या पाचव्या दिवशी आज गुजरात फॉरचुनजायंट्स आणि हरियाणा स्टीलर्स या संघांचा पहिला सामना होणार आहे. या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असून हा सामना जिंकून गुणतालिकेत झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याची गुजरात संघाला ही चांगली संधी आहे. तर हरियाणा संघ मागील सामना यु मुंबा संघा विरुद्ध हरला होता आणि हा सामना जिंकून प्रो कबड्डीमधील पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील.

हरियाणा संघाची ताकद आहे त्यांचे डिफेंडर्स सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर. त्याच बरोबर रेडींगमध्ये वझीर सिंग कमाल करू शकतो पण गुजरात संघ हरियाणा संघापेक्षा समतोल वाटत आहे. गुजरातची ताकद जरी डिफेंडिंग असली तरी या संघाकडे सुकेश हेगडे, राकेश नरवाल, सचिन, पवन शेरावत आणि महेंद्र राजपूत हे रेडर असतील. महेंद्र राजपूत याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गुजरात सांघाचा मागील सामन्यातील डिफेन्समधील दमदार खेळ आज परत झाला तर हरयाणा संघाला ही लढत अवघड जाणार आहे.

दुसरा सामना हा बेंगाल वॉरियर्स आणि तेलगू टायटन्स या दोन संघात आहे. तेलुगू टायटन्स संघाचा हा सामना या स्पर्धेतील पाचवा सामना ठरणार असून बेंगाल वॉरियर्स हा संघ प्रो कबड्डीमधील त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून बेंगालचा संघ मोसामाची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असेल. तेलुगू टायटन्स संघाने सलग तीन सामने घरच्या प्रेक्षकांसमोर गमावले आहेत.

बेंगाल संघ नेहमी त्यांच्या डिफेन्ससाठी प्रसिद्ध असायचा पण यंदाचा संघ रेडींग डिपार्टमेंटमध्ये मजबूत दिसतो आहे. बेंगाल संघाकडे त्यांचा लाडका जांग कुन ली तर असणारच आहे शिवाय यंदाच्या मोसमात संघाने नवीन घेतलेला खेळाडू मनिंदर सिंग याच्यावर देखील रेडींगची जबाबदारी असणार आहे. त्याच बरोबर दिपक नरवाल हा एक चांगला रेडर संघाकडे असून पण त्याला किती संधी मिळेल हे सांगता येणार नाही. बंगालच्या संघाकडे भूपिंदर सिंग हा यु मुंबाचा माजी खेळाडू आहे जो उत्तम ऑलराऊंडर आहे. त्याचबरोबर बंगालकडे रण सिंग हा डिफेन्सिव्ह ऑलराऊंडर आहे जो संघाचा कर्णधार असणाऱ्या सुरजीत सिंगला डिफेन्समध्ये मोलाची साथ देऊ शकतो.