बेंगलुरु बुल्स पेलणार का बेंगाल वॉरियर्सचे तगडे आव्हान ?

प्रो कबड्डीमध्ये आज फक्त एक सामना होणार आहे तो म्हणजे बेंगलुरु बुल्स आणि बेंगाल वॉरियर्स या संघात. बेंगाल वॉरियर्स मागील दोन्ही सामने जिंकले असून त्यांचा हा तिसरा सामना असणार आहे. मागील सामन्यात त्यांनी यु.पी.योद्धाचा पराभव केला होता तर पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्सचा पराभव केला होता.

बेंगाल वॉरियर्सचे रेडर खूप चांगला खेळ करत सर्वांना प्रभावीत करत आहेत. हा संघ रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत आहे. या संघाने मागील सामन्यात यु.पी.योद्धा पेक्षा दुप्पट गुण मिळवले होते आणि त्यांना पराजित केले होते. या संघासाठी जँग कुन ली, मनिंदर सिंग, विनोद कुमार रेडींगमध्ये चांगली कामगिरी करत आहेत तर कर्णधार सुरजीत सिंग आणि रण सिंग हे डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करत आहेत. यांच्याकडून या सामन्यात अश्याच चांगल्या खेळाची वॉरियर्सचे पाठीराखे अपेक्षा करत असतील असे वाटते आहे.

बेंगलुरु बुल्सने काल झालेला सामना बरोबरीत सोडवला असला तरी या संघाची लय बिघडली आहे. ते या सामन्यात चांगली कामगिरी करतील हे नक्की मात्र ते सामना जिंकतील का यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. मागील सामन्यात शेवटच्या २ मिनिटांमध्ये या संघाला ५ गुणांची आघाडी राखता आली नाही आणि हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यापूर्वी बेंगलुरु बुल्स सलग दोन सामने हरला आहे. या संघाची सारी दारोमरदार रोहित कुमारवर असणार आहे. अजय कुमारला चांगली कामगिरी करता आली नाही. आशिष सांगवान हा मागील सामान्यांपासून लयीत परततोय याचे त्याने संकेत दिले आहेत.

या सामन्यात जर बेंगलुरु बुल्स संघाला विजय मिळवायचा असेल तर रोहित कुमारवर अवलंबून न राहता उत्तम सांघिक खेळ करावा लागेल. बेंगाल वॉरियर्स संघाला या सामन्यात विजयाची जास्त संधी असणार आहे हे काही वेगळे सांगायला नको.