प्रो कबड्डी: कबड्डीचा जॅक कॅलिस ‘मंजीत चिल्लर’ साजरा करतोय आपला ३१वा वाढदिवस !

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी ५ चा जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार मनजीत चिल्लर आज त्याचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. मनजीत चिल्लरला कबड्डी समालोचक जायन्ट किलर म्हणूनही संबोधतात.

डिफेन्समध्ये बॅक होल्ड आणि फ्रंट ब्लॉकसाठी मनजीत ओळखला जातो. त्याचे रेडींगमधील कौशल्यही जगविख्यात आहे. संघाला गरज असेल तेव्हा रेडींगमध्येही तो गुण मिळवून देण्याची क्षमता ठेवतो. या दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करू शकत असल्याने तो प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू आहे.

मनजीतने आपले नाव प्रो कबड्डीच्या इतिहासात एक चांगला अष्टपैलू म्हणून तर लिहले आहेच पण त्याच बरोबर तो एक शांत आणि संयमी कर्णधारही आहे. पहिल्या दोन्ही मोसमात त्याने स्वतःच्या बळावर बेंगळुरू बुल्सच्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत आणले होते. त्यांनतर पुढील २ मोसम तो पुणेरी पलटणचा कर्णधार होता आणि याही मोसमात त्याने त्याच्या संघाला उपांत्य फेरी पर्यंत पोहचवले होते. पण आतापर्यंत एकदाही त्याला प्रो कबड्डीचा अंतिम सामना खेळणाची संधी मिळाली नाही. पण तो चारही मोसमात संघाला उपांत्य फेरीत नेणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

प्रो कबड्डीचा इतिहास बघितल्यावर लक्षात येते की पहिल्या दोन मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटणच्या संघात जेव्हा मनजीत गेला तेव्हा त्याने पुण्याच्या संघाचा कायापालट केला आणि सलग २ मोसम संघाला उपांत्य फेरीत आणले.

मनजीतच्या नावावर ६२ सामन्यात ४१६ गुण आहेत ज्यापैकी रेडींगमध्ये २१० तर डिफेन्समध्ये २०६ गुण आहेत. त्याने याच मोसमात प्रो कबड्डी इतिहासात डिफेन्समध्ये २०० गुणांची कमाई करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो प्रो कबड्डीमधील रेडींग आणि डिफेन्समध्ये २०० -२०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू बनला आहे.

या स्टार खेळाडूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रो कबड्डी आणि जयपूर पिंक पँथर्स या त्याच्या संघाने त्याला ट्विटरवर शुभेछ्या दिल्या आहेत.