हे देखील हार्दिक पांड्या बरोबरच मालिकावीर किताबासाठी प्रबळ दावेदार

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका ४-१ अशी खिशात घातली. हार्दिक पांड्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. या मालिकेत हार्दिक बरोबरच आणखी बऱ्याच भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झाली, अशाच काही खेळाडूंचा आढावा.

हार्दिक पांड्या: सध्याच्या भारतीय संघाचा स्टायलिश पण तितकाच गुणवान खेळाडू. या संपूर्ण मालिकेत हा अष्टपैलू खेळाडू फक्त चांगला खेळला नाही तर त्याने समोरच्या संघाची झोप उडवली. त्याने या संघात फिनिशरची जबाबदारी चोख पार पाडत २ अर्धशतकांसह २२२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने ६ बळीही घेतले ज्यामुळे तो या किताबाचा मूळ मानकरी ठरला.

अजिंक्य रहाणे: शिखर धवनच्या जागेवर संधी मिळालेल्या या गुणवान खेळाडूने संधीचे सोने केले. त्याने ५ सामान्यांच्या या मालिकेत ४ अर्धशतके करत २४४ धावा केल्या आहेत. सलामीला येऊन अर्धशतक करूनही त्याला एकही शतक करता आले नाही ही एक गोष्ट सोडली तर त्याने सलामीवीराची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच त्याने रोहित शर्मा बरोबर सलग ३ शतकी भागीदाऱ्याही रचल्या आहेत.

कुलदीप यादव: भारताला मिळालेला एक उत्तम चायनामन गोलंदाज. या मालिकेत कुलदीप यादव चांगलाच चमकला तो त्याने घेतलेल्या हॅट्ट्रिकमुळे. ५ सामन्यांच्या मालिकेत ४ सामन्यात संधी मिळालेल्या या युवा गोलंदाजाने फक्त चांगली गोलंदाजीच केली नाही तर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य खेळाडूंना बाद करण्यात यशही मिळवलं. त्याने या मालिकेत ७ बळी घेत या मालिकेतील सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत ३ रा क्रमांकही पटकावला.

रोहित शर्मा: श्रीलंका विरुद्धच्या मालिकेपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहितने ऑस्ट्रलिया विरुद्धच्या मालिकेतही आपला फॉर्म कायम ठेवला. भारताचा हा सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करून देत होता त्यामुळे पुढच्या फलंदाजांवरचा दबाव कमी होत होता. रोहितने या मालिकेत १ शतकासह २ अर्धशतके केली आहेत. या मालिकेत त्याने २९६ धावा करत मालिकेतल्या सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत.