म्हणून मनीष पांडेला नाही मिळणार भारतीय संघात संधी !

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापणाने श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर कसोटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला संधी देण्याचे ठरवल्यामुळे मनीष पांडेला संघात स्थान मिळवण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.

अतिशय नम्र असा हा खेळाडू याबद्दल बोलताना मनीष पांडे म्हणतो, ” ही तीच जागा आहे जिथे मी खेळतो. चौथ्या क्रमांकावर मी शक्यतो फलंदाजी करत आलो आहे. परंतु जर संघाला दुसरा कोणता खेळाडू या जागेसाठी जास्त चांगला वाटत असेल तर मला काहीच हरकत नाही. सध्या केएल राहुल चांगली कामगिरी करत आहे. त्याला जर तिथे संधी मिळाली तर मला नक्कीच आनंद होईल. ”

“संघ व्यवस्थापन जो काही निर्णय घेईल त्याचा मी नक्कीच आदर करेल. मी ऑस्ट्रेलिया संघाबरोबर जेव्हा चांगली कामगिरी केली तेव्हा मी चौथ्याच स्थानी खेळत होतो. मला त्या जागी मी कशी कामगिरी केली हे नक्की आठवते. त्याच जागी मी माझी संपूर्ण कारकीर्द फलंदाजी करत आलो आहे.

“न्युझीलँड मालिकेत मी ५व्या आणि ६व्या स्थानी खेळलो. परंतु मला तिथे चांगली कामगिरी करता आली नाही. मी जेमतेम १५ षटके फलंदाजी केली. त्यात एखाद्या जागी एवढ्या लवकर रुळने नक्कीच सोपे नाही. ”

हा २७ वर्षीय प्रतिभावान खेळाडू हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात होता परंतु ऐनवेळी दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. मनीष पांडेने आजपर्यंत भारताकडून १२ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ४३.५० च्या सरासरीने २६१ धावा केल्या आहेत.