या विजयासोबतच ‘झोन बी’ मध्ये पटणा पायरेट्स प्रथम क्रमांकावर

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमात काल बेंगलुरू बुल्स आणि पटणा पायरेट्स आमने सामने होते. या सामान्यात पटणाने बेंगलुरु बुल्सला ४६-३२ अश्या मोठ्या फरकाने हरवले. या सामन्यात पटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने उत्तम कामगिरी करत १५ गुण मिळवले तर त्याला मोनू गोयतने ७ गुण मिळवत मोलाची साथ दिली. बेंगलुरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने या सामन्यात बुल्स संघाकडून चांगली कामगिरी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही.

पहिले सत्र पूर्णपणे पटणाच्या नावावर राहिले. ६ व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ ४-४ अश्या बरोबरीवर होते पण त्यानंतर प्रदीप कुमारच्या सुपर रेडने पटणा संघाला पहिल्या सत्रात आघाडीवर नेले. त्यानंतर बेंगलुरु बुल्स ऑल आऊट झाले. रोहित कुमार आणि अजय कुमार या जोडीला चांगली कामगिरी करता आली नाही. पण पटणा संघासाठी मोनू गोयत आणि प्रदीप नरवाल यांनी बढत मिळवून देत पहिले सत्र ११-२३ असे आपल्या नावे केले.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघाने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. पण प्रदीप नरवालच्या सुपर रेड समोर बेंगलुरू बुल्स संघ टिकाव धरू शकला नाही. रोहितकुमारने मागील तिन्ही सामन्यात सुपर टेन मिळवले होते पण या सामन्यात त्याला ८ गुणांवर समाधान मानावे लागले. पहिल्या सत्रातील आघाडी कायम ठेवत पटणा संघाने हा सामना ४६-३२ असा जिंकला.

या विजयामुळे ‘झोन बी’ मध्ये पटणा पायरेट्स १५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आले तर घरच्या मैदानावरील सलग दोन सामने गमावल्यामुळे बेंगलुरू बुल्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.