मुंबईकर बॉल बॉय’चा कालच्या सामन्यातील विडिओ व्हायरल !

मुंबई । काल भारत विरुद्ध न्यूजीलँड सामन्यात भारतीय संघ ६ विकेट्सने पराभूत झाला. परंतु ह्या सामन्यात विराटचे शतक आणि विराट- धोनीचा ब्रोमान्स सोडून अजून एका गोष्टीची खूप चर्चा झाली ती अर्थात मुंबईकर आयुष झिमरेची.

विराट काल तुफानी फटकेबाजी करत असताना विराटने एक चेंडू सीमारेषेवर भिरकावून दिला. यावेळी बॉल बॉय म्हणून जबाबदारी पार पाडत असलेल्या आयुषने हा झेल एकाहाताने टिपला.

त्यावेळी तेथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या कॉलिन मन्रोने आयुषच्या ह्या कामगिरीला दाद दिली. हा विडिओ जेव्हा मोठ्या स्क्रीनवर पुन्हा दाखवण्यात आला तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात आयुषचे कौतुक केले.

हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा २५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराटने ऍडम मिल्नेच्या आखूड चेंडूवर विराटने हा फटका मारला होता.

मुंबई क्रिकेटमध्ये बॉल बॉय म्हणून कनिष्ठ गटातील खेळाडू जबाबदारी पार पडतात. मुंबई क्रिकेटमध्ये याची मोठी परंपरा आहे. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अगदी सुरुवातीच्या काळात ही जबाबदारी पार पाडली आहे तर सचिनच्या २००व्या कसोटीत अर्जुन तेंडुलकरनेही ही जबाबदारी पार पाडली होती.

मुंबईकर आयुष हा वांद्र्यातील संजीवनी क्लब तसेच मुंबई अंडर १६च्या संघातून खेळतो. काल आयुषने मुंबई रणजीचीच जर्सी घातली होती.