माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा

आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी (18 डिसेंबर) पार पडला. या लिलावात अनेक संघानी युवा खेळाडूंवर बोली लावण्याला पसंती दिली. त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंवर यावर्षी बोली लागली नाही.

यामध्ये ब्रेंडन मॅक्यूलम, कोरी अँडरसन, शॉन मार्श, डेल स्टेन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारताचा फलंदाज मनोज तिवारीवरही कोणत्याच संघाने बोली लावलेली नाही.यामुळे तो निराश झाला असून त्याने त्याची नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

मागील वर्षी त्याची आयपीएलमधील कामगिरी खराब झाली होती. त्याने 5 सामन्यात 47 धावाच केल्या होत्या. त्याला यावर्षी पंजाबने संघातून मुक्त केले होते.

त्याने 2017 ला रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे 2017 च्या चांगली कामगिरीनंतरही कोणत्याच संघाने बोली न लावल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

तसेच त्याने 2011 ला विंडीज विरुद्ध शतक केल्यानंतरही त्याला भारतीय संघातून पुढील 14 सामन्यांसाठी का वगळण्यात आले असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

त्याने ट्विट करताना म्हटले आहे की, ‘आश्चर्य वाटत आहे की माझे काय चूकले. मी जेव्हा माझ्या देशासाठी शतक केले आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर मला पुढील 14 सामन्यांसाठी वगळण्यात आले. 2017 ला मला मिळालेल्या पुरस्कारांकडे पाहुन माझे काय चूकले हा प्रश्न पडला आहे.’

तिवारी आयपीएलमध्ये 2008 च्या पहिल्या मोसमापासून खेळत आहे. त्याच्यासाठी 2011 चा मोसम सर्वोत्तम ठरला होता. 2011 मध्ये तो कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी त्याने 15 सामन्यात 359 धावा केल्या होत्या. तसेच त्याने 2017 मध्ये पुण्याच्या संघाकडून खेळताना 15 सामन्यात 324 धावा केल्या होत्या.

तसेच त्याने नुकतेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध बंगालकडून खेळताना द्विशतक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

पंचांवर ओरडणं जगातील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडूला पडले चांगलेच महागात

तो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी

…तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीची होणार सुट्टी