विश्वचषकाच्या निवडीचा विचार होता डोक्यात, रिषभ पंतचा खुलासा

सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2019 चा 40 वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 36 चेंडूत नाबाद 78 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामन्यानंतर बोलताना पंतने त्याच्या डोक्यात सातत्याने विश्वचषकासाठी निवडीचा विचार येत होता, हे मान्य केले आहे.

तो म्हणाला, ‘मला छान वाटत आहे. महत्त्वाच्या सामन्यात तूमच्या संघाला विजय मिळवून दिल्याने चांगले वाटते. मी खोटे बोलणार नाही. विश्वचषकासाठीच्या निवडीचा विचार माझ्या मनात चालू होता.

‘मी माझ्या खेळावर लक्ष्य केंद्रित केले. मी माझ्यातील क्षमतेवर विश्वास ठेवला. त्याचा मला फायदा झाला. मला कळाले होते खेळपट्टी कशी आहे आणि मी त्याचा फायदा घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या संघातील प्रत्येकाला त्यांची भूमीका माहित आहे आणि स्टाफ आम्हाला सतत सांगतही असतात.’

काही दिवसांपूर्वी विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या  संघात पंतला संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी दिनेश पंतला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी या निर्णयावर टीका केली आहे. तर अनेकांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थानकडून अजिंक्य रहाणेने नाबाद 105 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे या दोघांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 6 बाद 191 धावा करत दिल्ली समोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून पंतबरोबरच सलामीवीर फलंदाज शिखर धवनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पृथ्वी शॉने 42 धावांची उपयुक्त पूर्ण खेळी केली. त्यामुळे दिल्लीने 19.2 षटकात 192 धावांचे आव्हान 6 विकेट्स बाकी ठेवत सहज पूर्ण केले.

गोलंदाजीत राजस्थानकडून श्रेयस गोपालने 2, तर रियान पराग आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच दिल्लीकडून कागिसो रबाडाने 2 आणि इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

तेव्हा धोनी आता पृथ्वी शॉ, जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मिळाले जीवदान, पहा व्हिडिओ

आयपीएल २०१९चा अंतिम सामना चेन्नईला नाही तर होणार या ठिकाणी

१० वर्षांपूर्वीचा तो फोटो पाहुन कोहली, स्टेनने दिली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ