जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप: महिला एकेरीत दोन पदके निश्चित

ग्लासगो : येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पीयनशिपमध्ये भारतीय महिला खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि साईना नेहवाल यांनी चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत प्रवेश केल्याने भारतीयांची दोन पदके निश्चित झाली आहेत.

उपांत्यपूर्व सामन्याच्या फेरीत पी.व्ही.सिंधूने सुन यी या चायनीज महिला खेळाडूचे आव्हान परतवून लावले. हा सामना सिंधूने २१-१४,२१-९ असा जिंकला. हा सामना जिंकण्यासाठी तिने फक्त ३८ मिनिटे घेतली. २०१३,२०१४ साली जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक विजेती सिंधूसाठी हे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसरे पदक असणार आहे. सिंधूने मागील वर्षी झालेल्या रिओ ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. साईना पुढील सामना चेन युफी या चायनीज खेळाडूंशी होणार आहे.

साईना नेहवालने देखील या चॅम्पियनशिपमधील पदक निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईनाने स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिल्मोर हिचे तागडे आव्हान २१-१९,१९-२१,२१-१४ असे परतवून लावले. साईनाचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या नोजुमी ओकूहूरा हिच्याशी होणार आहे. नोजमीने मागील सामन्यात गतविजेती आणि यंदाची ऑलम्पिक विजेती खेळाडू कॅरोलिना मारिन हिला पराभूत केले आहे.

दोन्ही भारतीय महिला खेळाडू साईना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू जर आपले सामने जिंकले तर या दोन्ही भारतीय खेळाडू बॅडमिंटन चॅम्पियनशीपची अंतिम लढत खेळताना दिसतील. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरतील. एप्रिलमध्ये साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिजच्या अंतिम सामन्याची लढत खेळली होती. एखाद्या सुपर सिरीजच्या अंतिम लढतीत दोन्ही भारतीय खेळाडू खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. तर तशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला होता.