जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला पुण्यात जल्लोषात सुरुवात

पुणे । ढोल-ताशांचा निनाद…घोडयावरुन निघालेली खेळाडूंची शोभायात्रा…परदेशी खेळाडूंचे केलेले औक्षण…कथकनृत्यातून सादर झालेली गणेशवंदना…चिमुकल्यांनी सादर केलेली जिम्नॅस्टीकची प्रात्याक्षिके अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन झाले. कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकाविणारा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, स्पर्धा निरीक्षक लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर, आॅलिम्पियन अंजली भागवत, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, शाळा आणि शिक्षण विभागाचे उपमहासंचालक राजेंद्र पवार, आनंद व्यंकेश्वर, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यावेळी उपस्थित होते.

मंगळवार दिनांक २४ एप्रिल २०१८ पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी भारताचे अ व ब संघ, तुर्की, युएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरीया, ब्राझील, चायनीज तैपई, फ्रान्स, चीन, इंग्लड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली हे १४ संघ पुण्यात आले आहेत. पुण्याला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे तांत्रिक बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे नरेंद्र सोपल यांनी सांगितले. वर्षा उपाध्ये आणि क्षिप्रा जोशी यांच्या प्रीमीअर जिम्नॅस्टीक आणि रिदमिक अ‍ॅकेडमीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.