रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या 2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर काल(17 एप्रिल) अंबाती रायडू, रिषभ पंत आणि नवदीप सैनी हे खेळाडू या विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असतील याची माहिती देण्यात आली होती.

आता रायडू, पंत आणि सैनी यांच्याबरोबरच इशांत शर्मा आणि अक्षर पटेल हे देखील या विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असणार आहेत.

याबद्दल बीसीसीआयचे पदाधिकारींनी आयएएनएसशी बोलताना सांगितले आहे की 5 खेळाडू हे राखीव खेळाडू असतील. त्यामुळे त्यांनी गरज लागली तर इंग्लंडला जाण्याची तयारी ठेवावी.

विशेष म्हणजे या 5 राखीव खेळाडूंपैकी सैनी हा खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर यांच्यासह भारतीय संघाला विश्वचषकादरम्यान नेटमध्ये सराव देण्यासाठी आधीच इंग्लंडला जाणार आहे.

बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणाले, ‘इशांत, अक्षर, पंत, रायडू आणि सैनी यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने त्यांना याबद्दल माहिती दिली आहे. सैनीप्रमाणे अन्य चार जण संघाबरोबर इंग्लंडला जाणार नाही. पण गरज लागली तर त्यांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.’

‘आम्ही दोन फलंदाज, दोन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू राखीव खेळांडूमध्ये ठेवण्याचा विचार केला होता. तसेच यावेळी सर्व संघ साखळी फेरीत एकमेकांशी सामना खेळणार असल्याने बराच काळ चालणाऱ्या या स्पर्धेत राखीव पर्याय असणे आवश्यक आहे.’

इशांत हा इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने या स्पर्धेत अंतिम सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. तसेच त्याला 2015 च्या विश्वचषकातही भारतीय संघात संधी मिळाली होती. परंतू तो विश्वचषकाआधीच दुखापतग्रस्त झाल्याने त्याला खेळता आले नव्हते.

परंतू मागील काही दिवसांत इशांतने गोलंदाजीत चांगली प्रगती करताना त्याच्या गोलंदाजीत आलेल्या परिपक्वतेने सर्वांना प्रभावित केले आहे.

त्याच्याबद्दल बोलताना बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणाले, अनुभव बाजारातून विकत घेऊ शकत नाही. इशांत हा आता परिपक्व गोलंदाज आणि त्याला काय गरजेचे आहे हे माहित आहे. त्याला दबाव हाताळता येतो. याआधीही त्याने असे केले आहे. तो पुन्हा असे करुही शकतो.

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व

चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत चौथ्यांदाच घडली अशी गोष्ट

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ