टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला विजेतेपद

पुणे। एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-7(2), 7-6(5)असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत रोहन बोपन्ना व दिवीज शरण या भारतीय जोडीने विजेतेपद पटकावले

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या 32 वर्षीय केविन अँडरसन याने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 39 वर्षीय क्रोएशियाच्या इवो कार्लोविचवर निर्विवाद वर्चस्व राखले.

उत्कंठावर्धक 2 तास 44 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी वेगवान सर्व्हिसवर भर देताना एकूण 57 बिनतोड सर्व्हिसचा वर्षाव केला. त्यातील 21 बिनतोड सर्व्हिस करणाऱ्या केविन अँडरसनने अप्रतिम परतीचे फटके लगावताना हि लढत जिंकली. एटीपी टूरच्या इतिहासातील सर्वाधिक उंच खेळाडू अंतिम फेरीत खेळण्याचा विक्रम यावेळी नोंदविला गेला. 6फूट 8 इंच उंचीच्या कार्लोविचने पहिल्या सेटमध्ये पहिल्या सर्व्हिसवर 90टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिस 54 टक्के यश मिळवले.

कार्लोविचने पहिल्या सेटमध्येच 11 बिनतोड सर्व्हिसचा मारा केला. परंतु परतीचे फटके तितकेसे परिणामकारक नसल्यामुळे त्याला अँडरसनची सर्व्हिस भेदता आली नाही. कार्लोविचने दोन ब्रेक पॉईंट वाचवताना हा सेट टायब्रेकमध्ये नेला. पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये कार्लोविचने एका बिनतोड सर्व्हिसच्या आधारे 2-1आघाडी घेतली होती. परंतु अँडरसनने सलग पाच गुण जिंकताना पुनरागमन केले आणि एका बिनतोड सर्व्हिससह हा सेट 7-6(4)असा जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये अँडरसन याने टायब्रेकमध्ये 4-1अशी आघाडी घेतली होती. परंतु त्याच्या डबल फॉल्टचा फायदा घेत कार्लोविचने पुनरागमन केले आणि स्वतःची राखत हा सेट 7-6(2)असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये केविन अँडरसन 3-5असा पिछाडीवर असताना कार्लोविचने केलेल्या डबल फॉल्टमुळे त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली. अँडरसनने कार्लोविच सर्व्हिस ब्रेक करत पाठोपाठ स्वतः ची सर्व्हिस राखताना आघाडी घेतली आणि हेच वर्चस्व कायम राखताना तिसरा सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दुहेरीत अंतिम फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली. 1तास 3 मिनिटे झालेल्या पहिल्या सेटमध्ये सामन्यात 4-3अशा फरकाने आघाडीवर असताना रोहन बोपन्ना व दिवीज शरण जोडीने लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांची आठव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्येदेखील रोहन बोपन्ना व दिवीज शरण जोडीने आपले वर्चस्व कायम राखले.या सेटमध्ये 2-2असे समान गुण असताना रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी पाचव्या गेममध्ये

लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 4-2अशी आघाडी घेतली. पण हि आघाडी त्यांना फार काळ टिकवता आला नाही. लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांनी सातव्या गेममध्ये रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी चतुराईने खेळ करत नवव्या गेममध्ये लूक बांब्रिज व जॉनी ओमाराची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

स्पर्धेतील विजेत्या केविन अँडरसनला 90,990 डॉलर व 250एटीपी गुण, तर उपविजेत्या इवो कार्लोविचला 49,205डॉलर व 150गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बँकिंग क्षेत्रातील उच्च पदस्त आणि सामाजिक कार्यकर्त्या, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पेट्रन अमृता फडणवीस आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे , टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक वाहन विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड(ब्रँडिंग विभागाचे)चे विनीत कौल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र सरकारच्या एफडीए कमिशनर पल्लवी दराडे, एमएमआरडीएचे संजय खंदारे, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एटीपी सुपरवायझर मिरो ब्रातोव्ह आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

एकेरी गट: अंतिम फेरी:
केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका)(1)वि.वि.इवो कार्लोविच(क्रोएशिया) 7-6(4), 6-7(2), 7-6(5)

दुहेरी गट: अंतिम फेरी:
रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)(1)वि.वि. लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन)6-3, 6-4.