जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत भारत अ संघाची ब्राझीलवर मात

पुणे | भारत अ मुलींच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सिलेक्टेड टीममध्ये ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. सिलेक्टेड टीम्समध्ये मुलींच्या ग्रुप-२ मध्ये भारत अ संघाने ब्राझीलवर ५-०ने मात केली. यातील दुहेरीच्या पहिल्या लढतीत निकिता-अंजना कुमारी जोडीने मारिया रोचा-लोरेना व्हिएरा जोडीवर १९-२१, २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला. यानंतर शिवप्रिया-चिमरन कलिता जोडीने माद्रदो-ग्लेयसी मौरा जोडीवर २१-७, २१-१२ अशी मात केली. एकेरीत निकिताने मारियावर २१-१४, २१-१० असा, प्रेरणा अल्वेकरने सिझिअने फेरोवर २१-६, २१-८ असा, तर कलिताने लोरेनावर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.

सिलेक्टेड टीममध्ये मुलांच्या गटात भारत अ संघाने भारत ब संघावर ५-०ने मात केली. यात दुहेरीत रितूपर्णा बोरा – त्रिखा वरुण जोडीने आर्यमन-अनिश जोडीवर २१-१६, ८-२१, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यानंतर मन्नेपल्ली तरुण -पारस माथूर जोडीने गौतम -अर्जुन जोडीवर २१-१८, २१-१८ अशी मात केली. यानंतर एकेरीत मोनिमुग्धाने अनिरुद्धसिंगचे आव्हान २१-१५, १४-२१, २१-१२ असे परतवून लावले. यानंतर तरुणने अर्जुनवर २१-१६, १८-२१, २१-१० अशी, तर पारसने गौतमवर २१-१९, २१-१८ अशी मात केली.

शालेय गटात पराभवाने सुरुवात
या स्पर्धेतील शालेय गटातील मुलींच्या ग्रुप-१मध्ये चीनने भारत अ संघावर ५-०ने मात केली. यातील एकाही लढतीत भारतीय मुलींना चीनच्या मुलींसमोर आव्हान निर्माण करता आले नाही. यातील पाचही लढती एकतर्फीच झाल्या. दुहेरीतील पहिल्या लढतीत यिंग- क्विनी जोडीने भारताच्या इती – प्रांजल जोडीला २१-५, २१-३ असे नमविले. यानंतर दुहेरीतील दुस-या लढतीत यांबिन-जिक्सिन जोडीने भारताच्या कैफी-वंशिका जोडीवर २१-३, २१-३ अशी मात केली. यानंतर एकेरीत यिंगने इतीवर २१-३, २१-३ असा, तर यान बिनने प्रांजलवर २१-१, २१-२ असा विजय मिळवला आणि चीनला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर जिक्सिनने अखेरच्या एकेरीच्या लढतीत कैफीवर २१-२, २१-५ अशी मात केली.

चीनने भारत ब संघाला नमविले
मुलांच्या ग्रुप-१मध्ये चीनने भारत ब संघावर ५-०ने मात केली. दुहेरीच्या पहिल्या लढतीत वेन्जून-झिकाई जोडीने मिहिर – नमराज जोडीवर २१-२, २१-४ असा सहज विजय मिळवला आणि चीनला आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीच्या दुस-या लढतीत जिआहिओ-लिफू जोडीने अभिमन्यू – अर्णव जोडीवर २१-४, २१-५ अशी मात केली. एकेरीत झिकाईने मिहिरला २१-४, २१-५ असे, तर वेन्जूनने नमराजला २१-३, २१-५ असे नमविले. एकेरीच्या अखेरच्या लढतीत लिफूने अभिमन्यूवर २१-८, २१-४ असा विजय मिळवला.

इंग्लंडची भारत अ वर मात
यानंतर मुलांच्या ग्रुप-२मध्ये इंग्लंडने भारत अ संघावर ५-०ने मात केली. यात दुहेरीत अलेक्स-टोबी जोडीने अक्षत-देवांश जोडीवर २१-४, २१-४ असा, तर मायकेल – इअन जोडीने प्रियांश-यशराज जोडीवर २१-३, २१-१ असा विजय मिळवला. एकेरीत अलेक्सने अक्षतला २१-३, २१-३ असे, टॉबीने देवांशला २१-५, २१-३ असे, तर मायकेलने यशराजला २१-३, २१-१ असे पराभूत केले.

कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकाविणारा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, स्पर्धा निरीक्षक लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर, आॅलिम्पियन अंजली भागवत, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे उपसंचालक आनंद व्यंकेश्वर यावेळी उपस्थित होते.

ढोल-ताशांचा निनादात घोडयावरुन खेळाडूंची शोभायात्रा काढण्यात आली. परदेशी खेळाडूंचे यावेळी औक्षण देखील करण्यात आले. कथकनृत्यातून सादर झालेली गणेशवंदना…चिमुकल्यांनी सादर केलेली जिम्नॅस्टीकची प्रात्याक्षिके अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन झाले.

मंगळवार, दिनांक २४ एप्रिल २०१८ पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी भारताचे अ व ब संघ, तुर्की, युएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरीया, ब्राझील, चायनीज तैपई, फ्रान्स, चीन, इंग्लड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली हे १४ संघ पुण्यात आले आहेत. पुण्याला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे तांत्रिक बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे नरेंद्र सोपल यांनी सांगितले. वर्षा उपाध्ये आणि क्षिप्रा जोशी यांच्या प्रीमीअर जिम्नॅस्टीक आणि रिदमिक अ‍ॅकेडमीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

निकाल – १) मुले – तुर्की- ५ वि. वि. ग्रीस-० (बार्कव-महंमद वि. वि. ख्रिस्तोस-निकोलोस २१-१३, २३-२१, सेमिह-मुस्तफा वि. वि. इओनिस-अँटोनिस २१-१२, २१-१६, बार्कव वि. वि. निकोलोस २१-७, २१-१५, महंमद वि. वि. ख्रिस्तोस २१-११, २१-१७, मुस्तफा वि. वि. स्टेफनोस २१-८, २१-१०).

२) चायनीज तैपेई – ५ वि. वि. जॉर्जिया – ० (हुंग टिंग- यू चिह वि. वि. निनो श्वेली पावले २१-९, २१-९, काई वेन – चिह वेई वि. वि. रफाएल – मिखाईल २१-३, २१-१, हुंग टिंग वि. वि. निनोश्वली २१-१३, २१-१०, यु चिह वि. वि. पावले २१-९, २१-१४, चिएन चोयू वि. वि. मिखाईल २१-३, २१-४).

मुली – ब्राझील – ४ वि. वि. क्रोएशिया – १ (सामिया-सानिया वि. वि. तिहाना – इंगा २१-११, २१-१२, सायने-ज्युलिया वि. वि. माजा -दोरोटी २१-४, २१-२, सामिया पराभूत वि. इंगा २१- १६, ९-२१, २०-२२, सानिया वि. वि. तिहाना २१-८, २१-१०, ज्युलिया वि. वि. दोरोटी २१-७, २१-६).