जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुलींचे ब्रॉंझपदक हुकले

पुणे । भारत अ मुलींच्या संघाला महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सिलेक्टेड टीममध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिस-या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारत अ मुलींच्या संघाला फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. चीनने चायनीज तैपेईला ३-२ असे पराभूत करून विजेतेपद मिळवले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत फ्रान्सने भारत अ संघाचे आव्हान ३-२ने परतवून लावले. यातील दुहेरीत डेसमन्स-ज्युलिएट मोइनर्ड जोडीने निकीता-शिवप्रिया जोडीवर २१-१३, २१-१० अशी मात करून फ्रान्सला १-०ने आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीच्या दुस-या लढतीत चिमरन कलिता-अंजनाकुमारी जोडीने शरॉन बौएर-चार्लोट गान्सी जोडीवर १६-२१, २२-२०, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि भारताला बरोबरी साधून दिली.

एकेरीत डेसमन्सने निकीताला २१-१९, २१-१८ असे पराभूत केले आणि फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आव्हान राखण्यासाठी भारताला पुढील लढत जिंकणे गरजेचे होते. मात्र, ज्युलिएटने कलिताचे आव्हान २२-२०, २१-१७ असे ३५ मिनिटांत परतवून लावले आणि फ्रान्सला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या अखेरच्या लढतीत अंजनाकुमारीने मारिक ब्रोक्सेलवर २१-१५, २१-१७ असा विजय मिळवला खरा, पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही.

शालेय गटात चायनीज तैपेईचे वर्चस्व

जागतिक शालेय मुलींच्या गटात एकूण १३ संघ सहभागी झाले होते. यांचे तीन गट करण्यात आले होते. यातील चीन, ब्राझील, यूएई, इटली, फ्रान्स, तुर्की, चायनीज तैपेई, क्रोएशिया यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढे चीनने यूएईवर, फ्रान्सने इटलीवर, तुकीर्ने ब्राझीलवर, तर चायनीज तैपेईने क्रोएशियावर मात करून उपांत्य फेरी गाठली. या फेरीत फ्रान्सने चीनवर, तर चायनीज तैपेईने तुर्कीवर मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत चायनीज तैपेईने फ्रान्सवर विजय मिळवला. चायनीज तैपेई पहिल्या, फ्रान्स दुस-या, चीन तिस-या स्थानी राहिला. भारत ब संघ अकराव्या, तर भारत अ संघ तेराव्या स्थानी राहिला.

मुलांच्या गटातही चायनीज तैपेईने वर्चस्व राखले. अंतिम लढतीत चायनीज तैपेईने फ्रान्सवर मात करून अव्वल क्रमांक पटकावला. फ्रान्स दुस-या, तर चीन तिस-या स्थानी राहिला. भारत अ आणि ब संघ अनुक्रमे तेराव्या आणि चौदाव्या स्थानी राहिले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण भारतीय बॅडमिंटन महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, स्पर्धा निरीक्षक लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर, उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, चंद्रकांत कांबळे, स्विय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, विशेष कार्यअधिकारी कविता नावंदे, सहाय्यक संचालक सुधीर मोरे, फेरेरो इंडियाचे जनरल सेक्रेटरी इंदर चोप्रा, बी.व्ही.जी.चे उपाध्यक्ष उमेश माने, पोलीस निरीक्षक अरुण वायकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, मुख्य पंच उदय साने, संयोजन समितीतील संजय सबनीस, रवींद्र नाईक, सुभाष रेवतकर, सुवर्णा बारटक्के, सुनंदा पाटील, अनिल चोरमले, अविनाश पुंड, शेखर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. श्रीराम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

निकाल – सिलेक्टेड टीम – मुली – अंतिम लढत – चीन – ३ वि. वि. चायनीज तैपेई – २ (जिंगर ज्हँग-शुया ज्हेंग वि. वि. यू पेई चेंग-एन त्झू हुंग २१-१७, २१-१९, वू-ज्हेंग पराभूत वि. चिया वेई लिअँग-सिह यून लिन १२-२१, १३-२१, शुया ज्हेंग वि. वि. एन त्झू हुंग २४-२२, २१-१७, वू पराभूत वि. सिह युन लिन २१-१७, २०-२२, १८-२१, जिंगर ज्हँग वि. वि. सिन पेई त्साई २१-१९, १८-२१, २१-१३).

जागतिक शालेय मुली – अंतिम लढत – चायनीज तैपेई – ४ वि. वि. फ्रान्स – १ (सिन-चिह वू पराभूत वि. क्लारा-मॅरिअन १४-२१, २२-२०, १६-२१, फँग चू चेन-शिन यू वांग वि. वि. कॅमिली-अलिस लास्कॅरेट २१-९, २१-५, सिन वि. वि. क्लारा २१-१३, २१-५, वू – मॅरिअन १६-२१, २१-११, २१-१३, जोयू त्झू चेन वि. वि. कॅमिली २१-८, २१-१०).

जागतिक शालेय मुले – अंतिम लढत – चायनीज तैपेई – ४ वि. वि. फ्रान्स – १ (हुंग टिंग डू-यू चिह लिन वि. वि. दिमित्री-अलेक्सिस २१-९, २२-२०, काई वेन चेंग-चिह वेई लू वि. वि. थॉमस-फॅबिएन २१-८, २१-८, यू चिह लिन वि. वि. दिमित्री २१-१५, २१-१९, चिह वेई लू पराभूत वि. अलेक्सिस १९-२१, ८-२१, चिएन चोयू चेन वि. वि. थॉमस २२-२०, २१-१२).