वरळी स्पोर्टस् क्लबची कबड्डी- वेस्ली स्पोर्टस् क्लबचे दिमाखदार अजिंक्यपद

मुंबई । ज्या संघाने पूर्ण स्पर्धेत आपल्dया प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली होती, त्या वेस्ली स्पोर्टस् क्लबने वरळी स्पोर्टस् क्लबच्या तृतीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रेरणा मंडळाची 43-23 अशी 20 गुणांनी धुळधाण उडवत जेतेपद पटकावले. प्रेरणाचा रोहित गुरव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू तर वेस्लीचा प्रेमकुमार सर्वोत्कृष्ट पकडवीर ठरला. वेस्लीच्याच अरविंद कुमारने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला.

वरळी स्पोर्टस् क्लबच्या कबड्डी स्पर्धेचा शेवटचा दिवसही चढउतारांचा होता. स्पर्धेच्या पहिल्dयाच उपांत्य सामन्याचा निकाल पाच-पाच चढायांच्या डावात लागला तर अन्य दोन सामन्यात वेस्ली स्पोर्टस् क्लबपुढे एकाही प्रतिस्पर्ध्याचे काहीएक चालले नाही. त्यांनी उपांत्य लढतीत काळेवाडीच्या विघ्नहर्ता संघाचा 41-23 असा फडशा पाडला तर अंतिम सामन्यातही त्याच जोरदार खेळाची पुनरावृत्ती करत 43-23 अशा फरकासह जेतेपदाला गवसणी घातली. दोन्ही सामन्यात अरविंद कुमार आणि प्रेमकुमार यांचा भन्नाट खेळ पाहायला मिळाला. या दोन सामन्यांपूर्वी झालेल्dया उपांत्य सामन्यात प्रेरणा-आकांक्षाचा थरारक खेळ पाहायला मिळाला. या सामन्यावर प्रेरणा क्रीडा मंडळाचे पूर्णपणे वर्चस्व होते. रोहित गुरव आणि रोहित रसाळ यांनी वेगवान खेळ करीत मध्यंतरालाच 15-6 अशी आघाडी घेतली होती. पण मध्यंतरानंतर अखिल गावडे आणि सुरज पाटील यांनी यशस्वी चढायांचा जोरदार हलल चढवत आकांक्षा क्रीडा मंडळाला आघाडीवर नेले. पण शेवटच्या क्षणी खेळ 30-30 असा बरोबरीत सुटला. अखेर पाच-पाच चढायांच्या डावात प्रेरणा 6-5 असा जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम सामन्यात वेस्ली आणि प्रेरणा यांच्यात चुरस पाहायला मिळाली. पण वेस्लीने अरविंद कुमारच्या चढायांमुळे चांगलीच आघाडी घेतली. दुसऱया डावात अरविंदने सुरेख खेळ करीत वेस्लीची आघाडी इतकी वाढवली की सामना पूर्णपणे एकतर्फी केला. त्यानंतर प्रेरणाच्या डावाला कुणीही आघाडीवर नेऊ शकला नाही. वेस्ली स्पोर्टस् क्लबने या स्पर्धेच्या निमित्ताने वरळीकरांना जोरदार खेळ पाहण्याची संधी दिली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार सुनील शिंदे, सुनील कोठेकर, वरळी स्पोर्ट्स क्लबनचे अध्यक्ष तिरूपती शेकेली, सचिव मिलिंद ब्रह्मे, कोषाध्यक्ष राजेश सॅमसन, क्रीडा संघटक चंद्रकांत भारती, चंद्रशेखर राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.