ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुन्हा आखाड्यात, केली सुवर्ण कामगिरी

मुंबई । महाराष्ट्राचा स्टार मल्ल विजय चौधरी तब्बल ८-९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्पर्धात्मक कुस्ती खेळू लागला आहे. विजयने 30 व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले आहे.

हे सुवर्णपदक विजयने खुल्या वजनी गटात जिंकले आहे. २०१४ पासून ते २०१६ पर्यंत विजयने सलग ३ वर्ष महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा जिंकत ६० वर्षांच्या इतिहासात केवळ दुसरा महाराष्ट्र केसरी होण्याच्या मान त्याने मिळवला होता. त्यानंतर दुखापत आणि डी.वाय.एस.पी.पदाचे प्रशिक्षण यामुळे तो काही महिने कुस्तीपासून दूरच होता.

गेल्या महिन्यात ६१व्या महाराष्ट्र्र कुस्ती स्पर्धेपूर्वी महा स्पोर्ट्सशी बोलताना विजयने आपण आता पुन्हा तयारीला लागलो असून सराव सुरु केला असल्याचे सांगितले होते. आपण संध्याकाळच्या सत्रात सराव करत असून हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचेही विजय बोलला होता.

या स्पर्धेसाठी जेव्हा भुवगाव पुणे येथे तो आला होता तेव्हा चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता. विजयचा मोठा चाहता वर्ग हा महाराष्ट्रात आहे त्यामुळे पुन्हा स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन केल्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विजयने या स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत आपल्या सध्या करत असलेल्या तयारीची एक झलकच दाखवून दिली आहे.