कसोटी संघातील ६व्या क्रमांकासाठी वृद्धिमान सहाची जोरदार फलंदाजी

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील कसोटी मालिकेत भारतीय संघातील सहाव्या स्थानासाठी बरीच चर्चा रंगली आहे. यात आता भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान सहाने हे स्थान अनिश्चित असल्याचे सांगितले आहे.

सहाच्या फलंदाजी क्रमवारीत सध्या सतत बदल करण्यात येत आहेत. याविषयी तो म्हणाला ” असं नाही की मी नेहमी ७ किंवा ८ व्या स्थानी खेळतो, मी ६ व्या स्थानीही फलंदाजी करतो. जडेजा, अश्विन आणि मी प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेनुसार फलंदाजी क्रमवारीत बदल करतो.”

कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात सहाने ६व्या क्रमांका ऐवजी ८ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. याबद्दल तो म्हणाला “सामन्याच्या परिस्थितीनुसार  ६,७ किंवा ८ व्या यापैकी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायची हे ठरते. संघ व्यवस्थापनेच्या म्हणण्यानुसार यापैकी कोणताही क्रमांक असू शकतो.”

पहिल्या कसोटीत ५ गोलंदाज खेळवले गेले होते या विषयी बोलताना सहा म्हणाला ” तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये सामना २० बळी घेऊनच जिंकू शकता. त्यामुळे गोलंदाजांना आधी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता माझ्यासह अश्विन आणि जडेजालाही तळाच्या फळीत योगदान द्यावे लागेल.”

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरला नागपूरला खेळेल.