काल लग्न झालेल्या त्या खेळाडूने आज घेतल्या ६ विकेट्स

श्रीलंका संघाकडून यापूर्वी ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळलेल्या अकिला धनंजयाला लग्न भलतेच लकी ठरले आहे. काल या प्रतिभावान खेळाडूने लग्न करून आपल्या पारिवारिक जीवनाला सुरुवात केली तर आज भारताविरुद्ध खेळताना जबदस्त कामगिरी करत चक्क ६ विकेट्स घेतल्या.

गेला पूर्ण महिना ज्या भारतीय संघाने एकदाही श्रीलंका संघाला वर तोंड काढू दिले नाही त्या श्रीलंका संघाच्या या तरुण खेळाडूने भारताचे तब्बल ६ मोहरे टिपले. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केदार जाधव, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि अक्सर पटेल या दिग्गजांचा समावेश आहे.

जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय फलंदाजांपैकी चक्क तीन खेळाडूंना त्याने त्रिफळाचित केले हे विशेष.

आपली खूप वर्ष मैत्रीण असलेल्या नताली तेक्शिनी बरोबर त्याने काळ कोलंबो जवळ असलेल्या रामादिया रनमल हॉलीडे रिसोर्टमध्ये लग्न केले. रंगना हेराथ आणि अंजता मेंडिस हे दोन दिग्गज खेळाडू या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनीच साक्षीदार म्हणून सही केली.

अकिला धनंजयाचे वनडे पदार्पण २०१२ साली तर टी२० पदार्पण २०१३ साली झाले आहे.