१३व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल १२वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेस २५ मे पासून प्रारंभ

मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत देशभरातून 250हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे 25 मे ते 1 जून 2019 या कालावधीत रंगणार आहे.

एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, स्पर्धेत आकर्षक पारितोषिकांसह पहिल्या फेरीपासून खेळाडूंना एकूण 3 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एआयटीएचे सचिव आणि माजी एमएसएलटीएचे मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार पातळीवर टेनिसच्या प्रसारासाठी नक्कीच मदत होईल, असे भरत ओझा यांनी सांगितले.

स्पर्धेत 12वर्षाखालील मुलांच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ 64चा आहे, तर मुलींच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ 48चा असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 25 व 26 मे 2019 या दिवशी होणार असून मुख्य फेरीस सोमवार,दि.27 मेपासून प्रारंभ होणार आहे. तसेच, एमएसएलटीएचा वार्षिक शिष्यवृत्ती सोहळा स्पर्धेच्या अंतिम सामन्यांच्या दिवशी दि.1 जून रोजी होणार आहे.

स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच ऑफिशियल पायल जैन यांची सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेस क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे दि. 19मे पासून प्रारंभ झाला आहे.