कर्णधार धोनीची तुलना विराट आणि रोहित सोबत करणे अयोग्य

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल हा मर्यादीत षटकांच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावत असतो. कुलदीप आणि चहलच्या जोडीने वन-डे आणि टि-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

गोलंदाजी करताना धोनीकडून त्याला सतत मार्गदर्शन मिळत असते. चहलने विराट आणि रोहितच्या नेतृत्वाखाली देखील क्रिकेट खेळले आहे. पण सततच्या होणाऱ्या चर्चा आणि या तीन कर्णधारांची होणारी तुलना चहला आवडत नाही.

“धोनी, विराट आणि रोहित यांची नेतृत्व करण्याची शैली वेगळी आहे. आपण त्यांची तुलना एकमेकांसोबत करू शकत नाही.” असे चहलने सांगितले.

मैदानावर धोनीचा प्रभाव जास्त असतो. धोनीला परिस्थितीचे आकलन चांगल्याप्रकारे होते, त्यानुसार तो गोलंदाजांना सुचना देत असतो. त्यामुळे गोलंदाजाकडून चांगली कामगिरी होते.

“मला जेव्हा अडचण वाटते तेव्हा मी धोनीकडे जाऊन त्याचा सल्ला घेत असतो. धोनीचे निरिक्षण कौशल्य अप्रतिम आहे. आम्ही खरच स्वत:ला भाग्यवान समजतो की आम्हाला  धोनीसोबत क्रिकेट खेळायला मिळते.” असेही चहल म्हणाला.

“एशिया कपमधे पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पाॅवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याबाबत रोहित आणि धोनीने मला विचारले तेव्हा मी धोनीकडे पाहिले तर धोनीने मान हलवत प्रतिसाद दिला होता. तसेच स्टम्प टू स्ट्म्प गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे इमाम-उल-हकला पायचीत करण्यात यशस्वी झालो होतो.” असे चहलने सांगितले.

एशिया कप स्पर्धेत चहलने चांगली कामगिरी केली होती. त्याला अजून तरी कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. कसोटीत खेळण्यासाठी तो खूप आशावादी आहे.

महत्वाच्या बातम्या-