राहुल द्रविडचे विराट कोहलीवर जोरदार टीकास्त्र

भारताचा माजी महान खेळाडू राहुल द्रविडने काल कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली.

भारताचा १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा काल बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होता.

विराट आयसीसीने नुकतेच जाहीर केलेल्या क्रमवारीत वनडे आणि टी २० त अव्वल स्थानी आहे.

द्रविड म्हणाला ” विराटाची सामन्याआधीची विधाने धक्कादायक असतात.” पण त्याचवेळेस त्याची बाजू घेताना द्रविड म्हणाला, “तो स्वतः चांगला खेळतो त्यामुळे सामन्यावर परिणाम होत नाही”

द्रविड पुढे म्हणाला, “क्रिकेटचा खेळ अजून तरी कौशल्यावर आधारित आहे. त्याला विराटच्या दृष्टीने बघू नये. तो जसा आहे ते त्याचे व्यक्तिमत्व आहे. लोक मला विचारतात कि मी त्याच्या सारखा का वागत नाही? पण त्याच्यासारखे वागून मी माझ्यातले सर्वोत्तम देऊ शकत नाही. मी जर विराटसारखे टॅटू काढून आणि विराटसारखे वागायला लागलो तर मी माझ्याशी अप्रामाणिकपणा करेल”

“ऑस्ट्रलिया विरुद्ध मालिकेच्या वेळेस विराटची अनेक विधाने मला जास्त धक्कादायक आढळली. मी त्या वृत्तपत्रात वाचत होतो. पण मी विचार करायचो की कदाचित त्याला त्याचप्रकारची स्पर्धा हवी असेल. कदाचित त्याला सामन्यात तेच हवं असेल कारण त्यातून त्याच्यातले सर्वोत्तम बाहेर येते. पण म्हणून सर्वांसाठी तेच लागू होत असे नाही. पण शेवटी तो त्याच्यातले सर्वोत्तमच देतो.”

अजिंक्य रहाणे बद्दल बोलताना द्रविड म्हणाला ” रहाणे खूप वेगळा खेळाडू आहे. तो त्याच्यातले सर्वोत्तम त्याच्या वेगळ्या गोष्टी करून बाहेर काढतो. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणे जास्त महत्वाचे आहे”

द्रविड सध्याच्या लहान मुलांवर विराटचा झालेल्या परिणामांविषयी म्हणाला “मला तेव्हा जास्त काळजी वाटते जेव्हा १२,१३ आणि १४ वर्षांची मुले म्हणतात आम्हाला विराट कोहली बनायचे आहे, त्यावेळेस कदाचित त्यांना कळत नाही कि ते जसे आहेत त्याच्याशी कदाचित अप्रामाणिकपण करत असतील.”

तसेच द्रविड सध्याच्या खेळाडूंविषयी म्हणाला ” सध्याच्या भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास त्यांच्या खेळण्यातून दिसतो हे खूप स्पष्ट आहे. मी ज्या वेळेस भारतीय संघात खेळ सुरु केला होता त्यापेक्षा सध्या खेळ खूप स्पष्ट आहे. माझ्या लक्षात आहे की मी जेव्हा सुरवातीला विमानातून प्रवास केला तेव्हा मी माझ्या दौऱ्याविषयी खूप उत्सुक होतो.”

“आम्ही एक जरी कसोटी सामना जिंकला तरी आम्ही आनंदी होत असे आणि आम्ही अशा करायचो की पुढे पण आम्ही जिंकू किंवा अनिर्णित सामना राखू. परंतु सध्या भारतीय संघ ज्याप्रमाणे खेळत आहे ते बघून समजत की त्यांचा विश्वास, आत्मविश्वास आणि फिटनेस किती महत्वाचे आहे. माझ्यावेळेस असे नव्हते.”

“जेव्हा मी भारतीय अ संघाला बघतो तेव्हा त्यांच्यातल्या बिंधास्तपणाचा अनुभव येतो. कारण हे खेळाडू आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहे. मी जेव्हा २१-२२ वर्षांचा होतो तेव्हा बी कॉमची डिग्री मुबलक नव्हती त्यामुळे मला क्रिकेटवर जास्त लक्ष देण्याची गरज होती. जेणेकरून मी माझे जीवन चांगले व्यतीत करू शकेल. सध्या खेळाडूंना भारतासाठी खेळण्याआधीच आर्थिक सुरक्षितता मिळते आणि मला त्याबद्दल जास्त आनंद आहे.”

त्याचबरोबर द्रविड म्हणाला की ” मला युवा खेळाडूंना एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांना एजन्टची गरज नाहीये. ठीक आहे कि विराट आणि एम एस धोनीला एजन्टची गरज आहे कारण ते ज्या स्थरावर खेळतात तिथे त्यांना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यांना ते जे पैसे कमावतात त्यासाठी लोकांमागे धावणे जमत नाही. म्हणून त्यांना एजन्टची गरज असते.”

“पण जे तुम्ही १७- १८ वर्षाचे युवा आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याची गरज नाही. कारण मी युवा खेळाडूंचे होर्डिंग्स लागलेले बघितले नाहीत. मी जास्तीत जास्त धोनी कोहली यांच्यासारख्या खेळाडूंचे होर्डिंग्स बघतो. त्यामुळे एजन्ट ठेवण्याआधी तुम्हाला त्या स्थरापर्यंत पोहोचावे लागेल”

तसेच द्रविडने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराटच्या वादाबद्दलही वक्तव्य केले “मला या बद्दल जास्त काही बोलायचे नाही. पण कुंबळेच्या प्रशिक्षणाचा ज्या प्रकारे शेवट झाला तो अपेक्षित नव्हता. हे सगळं मीडियामध्ये यायला नको होत. अनिलच्या बाबतीत जे झाले ते खूप दुर्दैवी होते. तो खूप महान खेळाडू आहे. त्याने क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्याचबरोबर एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी होता. पण हे ज्याप्रकारे लोकांपर्यंत गेले ते व्हायला नको होते”