Pune: रामकुमार संपवणार का एटीपी चॅलेंजर विजेतेपदाचा दुष्काळ

पुणे । आज केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन हे दोन भारतीय खेळाडू अंतिम फेरीत लढणार आहेत. युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी अनुक्रमे स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज-मॅसिरास व भारताच्या साकेत मायनेनी यांचा पराभव करत ड्रीम फायनल गाठली आहे.

युकी भांब्री एटीपी क्रमवारीत १३७व्या स्थानी असून रामकुमार रामनाथन १५०व्या स्थानी आहे. युकीला स्पर्धेत तिसरे तर रामकुमारला चौथे मानांकन आहे. भारताकडून पुरुष एकेरीत हे खेळाडू एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी आहेत.

२३ वर्षीय रामकुमार २०१७मध्ये तिसऱ्यांदा एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. एप्रिल महिन्यात तो टालाहासी तर जुलै महिन्यात विनेक्ता चॅलेंजरच्या अंतिम फेरीत पोहचला होता.परंतु दोन्ही स्पर्धांत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

युकी भांब्री २०१७ मोसमात पहिल्यांदाच चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला असून यावर्षी त्याच्याकडून सिटी ओपन या एटीपी ५०० स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याचा कारनामा झाला आहे.

या स्पर्धेमधून विजेत्यास ८० एटीपी गुण, उपविजेत्यास ४८ गुण, उपांत्यफेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला २९ गुण तर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला १५ गुण मिळणार आहे.

त्यामुळे दोन्ही खेळाडू यास्पर्धेत विजेतेपदासाठी प्रयत्न करून यावर्षीच्या मोसमात पहिले वाहिले विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.