युकी भांबरीचा कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय

भारताचा टेनिस स्टार युकी भांबरीने काल इंडिया वेल्स स्पर्धेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रेंचच्या लुकास पॉईलला पराभूत केले.

१ तास २१ मिनिटे चाललेल्या या लढतीत भांबरीने लुकासवर ६-४, ६-४ ने मात केली. या विजयासह भांबरीने इंडिया वेल्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला.

भांबरीने पहिल्याच सेटपासून लुकासवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती त्याने पहिल्या सेटमध्ये सुरवातीलाच ४-१ अशी आघाडी घेतली होती. पण लुकासनेही नंतर चांगला खेळ केला. दुसऱ्या सेटमधे लुकासने भांबरीला कडवी झुंज दिली. परंतु अखेर भांबरीने हा सेट जिंकून दुसऱ्या फेरीतील विजय निश्चित केला.

याआधीही जागतिक क्रमवारीत ११० क्रमांकावर असणाऱ्या भांबरीने धक्कादायक निकाल नोंदवले आहे. त्याने ऑगस्ट २०१७ मध्ये सिटी ओपन स्पर्धेचा विजेता आणि जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर असणाऱ्या गेल मोनफिल्स पराभूत केले होते.

भांबरीचा तिसऱ्या फेरीतील सामना जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेच्या सॅम क्वेरेशी होणार आहे.